अनोख्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महापालिकेत पर्यावरण दिन साजरा


कल्याण : ५ जून - जागतिक पर्यावरण दिन आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठया अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. महापालिका क्षेत्रात वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होऊन, पर्यावरणाचे संतुलन रहावे या दृष्टिकोनातून पर्यावरण दिनाचे महत्त्व जनमानसापर्यंत विषद करण्याच्या अनुषंगाने, महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी , अति.आयुक्त सुनील पवार, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी आज भल्या पहाटे कल्याणमधील  आयुक्त बंगल्यापासून महापालिका मुख्यालयापर्यंत सायकलवर मार्गक्रमण केले.


महापालिका मुख्यालयात आयुक्त यांच्या हस्ते रिजन्सी निर्माण लि.,एव्हरग्रीन रजि.कं.प्रा. लि., मनोज पिल्लाई अन्गेल टेक्नोपॉवर, श्रीकांत शितोळे टायकून ग्रुप , विकास जैन इ. यांच्याकडून प्राप्त झालेल्या सायकली महापालिका शाळेतील 86 गरजू मुलांना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते मोफत प्रदान करण्यात आल्या. त्याचप्रमाणे हिरकणी या महिलांच्या सायकल ग्रुपला डॉ.अश्विन ठक्कर यांच्या सौजन्याने १०० हेल्मेट मोफत वितरीत करण्यात आले. तसेच दैनंदिन स्वरुपात सायकलवर कार्यालयात जाणा-या २५  व्यक्तींचा पर्यावरण दूत म्हणून महापालिका आयुक्त यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.


स्वत: आयुक्तांनी पालिका शाळेतील मुलांना सायकली देऊन संवाद साधल्याने, आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळी सारखा आहे, आम्हाला मिळालेल्या सायकलचा आम्ही दररोज वापर करणार अशा प्रतिक्रिया भारावलेल्‍या, प्रफुल्लीत झालेल्या मुलांनी या वेळी व्यक्त केल्या.डोंबिवलीतही 90 फुटी रस्त्यालगत अनेक सायकल प्रेमीच्या उपस्थितीत महापालिकेच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, संजय जाधव, सविता हिले यांच्या उपस्थितीत आज वृक्षरोपण करण्यात आले.


आयुक्तांच्या संकल्पनेतील निसर्गोत्सव २०२२ चे औचित्य साधत महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात  ५ जून व ६ जून रोजी विविध वृक्षवल्लींच्या हिरवाईचे मनोहरी प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.* त्यामुळे "वृक्षवल्ली आम्हा सोयरी" ही उक्ती प्रत्यक्षात साकार झाल्याचे आज दिसून आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका उपआयुक्त पल्लवी भागवत यांनी आज सकाळी केले.


या प्रदर्शनात आयुवैदिक वनस्पतींपासून , इनडोर झाडे, फुल झाडे, फळ झाडे, बोन्साय झाडे, हँगिंग झाडे, हँगिंग प्लांन्ट्स इ. विविध प्रकारच्या झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर या प्रदर्शनात भुगर्भातील भुजल पातळी वाढविण्याचे महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी रेन हार्वेस्टिंगचे गाडीरुपी मॉडेल देखील आजच्या प्रदर्शनातील आकर्षणाचा विषय ठरला आहे .


हे प्रदर्शन आज व उदया सकाळी १० ते रात्रौ ८ या वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार असून या प्रदर्शनात स्वस्त दरात फुलझाडांची विक्री देखील केली जाणार आहे.* हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडाळाच्या रुपाली शाईवाले व तसेच विविध नर्सरीचा लक्षणीय सहभाग  असल्याने पर्यावरण प्रेमींची मांदीयाळी या निमित्ताने जमलेली दिसून आली.

Post a Comment

0 Comments