नाल्यातील काढलेल्या गाळामुळे रस्ता वाहतुकीस बंद गेल्या चार दिवसांपासून एमआयडीसी परिसरात दुर्गंधी


कल्याण : नाल्यातील काढलेल्या गाळामुळे  रस्ता वाहतुकीस बंद झाला असून गेल्या चार दिवसांपासून डोंबिवली एमआयडीसी परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
डोंबिवली एमआयडीसी निवासी, वंदेमातरम् उद्यान जवळील सर्व्हिस रोड वरून कल्याण शीळ रोड व उस्मा पेट्रोल पंपकडे जाणाऱ्या कॉर्नर वरील मोठ्या नाल्यातील गाळ, कचरा गेल्या चार दिवसांपूर्वी काढण्यात आला होता.


हा गाळ ताबडतोब उचलावा अशी तेथील स्थानिक रहिवाशांनी मागणी केली होती. काढलेल्या गाळामुळे मोठी दुर्गंधी पसरली आहे. तसेच भर रस्त्यात गाळ टाकल्याने सर्व्हिस रोडवरील रहदारी, वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. 
याच जवळ खासदारांचे निवासस्थान पण आहे. पाऊस सुरू झाल्यास सदर गाळ, कचरा हा पसरून पुन्हा नाल्यात जाऊ शकतो.


शिवाय या नाल्याचा संरक्षक भिंतीला तडे गेले असून काही ठिकाणी भोके पडली आहेत. हा महत्त्वाचा मोठा नाला मिलापनगर वासियांसाठी महत्त्वाचा आहे कारण हा नाला पाऊसामुळे भरून वाहू लागल्यास ते पुढे पुराचे पाणी मिलापनगर, सुदर्शन नगर सह पूर्ण निवासी परिसरात येऊन काहींच्या घरात पाणी शिरते.


यावेळी अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे कारण मिलापनगर मधील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे असलेल्या मोठ्या मैदानावर क्रीडासंकुल उभे राहत असून त्याच ठिकाणी इमारती उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून त्यासाठी अनेक मोठे वृक्ष तोडण्यात आले होते. दरवर्षी त्या सखल मोकळ्या मैदानावर नाल्यातील ओव्हरफ्लो झालेले पावसाळी पाणी जमायचे पण आता तशी परिस्थिती नसल्याने ते पाणी आता जवळच्या निवासी क्षेत्रात घुसण्याची दाट शक्यता स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत.


 नाल्यातील बाहेर काढलेला गाळ  उघड्यावर काही दिवस असाच ठेवण्याची पद्धत केडीएमसीच्या ठेकेदारांची सर्वच ठिकाणी पाहण्यास मिळते.  या ठिकाणी काढलेला नाल्यातील गाळ, कचरा ताबडतोब उचलावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments