कल्याण पूर्वेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व अभ्यासिका मंजूर करण्याची मागणी

ज्ञानदिप बहुद्देशीय सामाजिक संस्थेने घेतली केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांची भेट


कल्याण : कल्याण पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व अभ्यासिका मंजूर करण्याची मागणी ज्ञानदिप बहुद्देशीय सामाजिक संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपशहर संघटक दादासाहेब महाले यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले.


       कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ८८ संतोष नगर येथे गावदेवी रोड व नाल्याला लागून असलेली सर्वे नंबर ८६ हि जागा काही वर्षांपासून स्मशानभूमीसाठी आरक्षित केलेली आहे. मात्र या जागेच्या चारही बाजूला इमारती व दाट लोकवस्ती आहे. यामुळे याठिकाणी स्मशानभूमी बनणे हे लोकांच्या मानसिक व शाररीक स्वास्थ्यास हानिकारक आहे. तसेच या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे. विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे या जागेवरील स्मशानभूमीचे आरक्षण हटवून त्याजागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व शैक्षणिक केंद अभ्यासिका बनविण्याची मागणी  ज्ञानदिप बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.


       याबाबत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठविले आहे. यावेळी ज्ञानदिप बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब महाले, त्रिरत्न बौद्ध विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, अभिवादन समिती कल्याण पूर्वचे खजिनदार मिलिंद सकपाळ, प्रियदर्शनी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भीमराव डोळस, सम्राट अशोक तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जाधव, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवचंद अंबादे, दत्तात्रय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अण्णा रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments