अभिनय कट्ट्यावर ज्ञानगंगा सेवेचा शुभारंभ


ठाणे, प्रतिनिधी  : आदित्य प्रतिष्ठान , ठाणे  वुई आर फॉर यू व श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ,ठाणे यांच्या वतीने किरण नाकती यांच्या संकल्पनेतून रविवार दिनांक १२'जुन २०२२ रोजी ज्ञानगंगा सेवेच्या माध्यमातून गरजु आणि दुर्बल घटकातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकं वितरण करण्यात आली  आहेत . 


          अभिनय कट्ट्यावर  ५२९ क्रमांकाच्या कट्ट्यावर ज्ञानगंगा सेवेचा शुभारंभ करण्यात आला.  शुभारंभ प्रसंगी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण सेवा केंद्राचे व्यवस्थापक महादेव जगताप,  भगवती विद्यालयाच्या माजी शिक्षिका  मनीषा रानडे , ज्येष्ठ साहित्यिक डाॅ . र म शेजवलकर त्याचबरोबर दिव्यांग कला केंद्राच्या संचालिका संध्या किरण नाकती आणि अभिनय कट्ट्याचे संस्थापक  किरण विष्णु नाकती या सर्व मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन या सेवेचा शुभारंभ केला.


         शिक्षणाच्या मुलभूत गरजा पूर्ण व्हायला हव्या आणि शिक्षणापासून कुणीही होतकरू विद्यार्थी वंचित राहु नये या उद्देशाने या ज्ञानगंगा सेवेची सुरुवात केली असल्याचे संचालक श्री. किरण नाकती यांनी सांगितले आहे. ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून पुस्तकं मिळत नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके यानिमित्ताने वितरित करण्यात आली आहेत.


          आता पर्यंत साधारण ३५० विद्यार्थ्यांनी ज्ञानगंगा सेवेचा लाभ घेतला आहे.नौपाडा व आजूबाजूच्या परिसरातील या सेवेचा लाभ घेतलेल्या पालकांनी किरण नाकती व संस्थेचे आभार मानले. त्याचबरोबर समाजातील ज्या मान्यवरांना या सेवेस आर्थिक मदत करण्याची ईच्छा असेल त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन संचालक  किरण नाकती यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments