उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ दिवस भरात ९२ हजार २६३ बालकांचे पोलिओ लसीकरण


ठाणे दि. १९ ( जि. प) : ग्रामीण भागातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड या तालुका क्षेत्रांमध्ये रविवारी झालेल्या उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ९२ हजार २६३ बालकांना डोस पाजण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. 


जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम जिल्हात राबविण्यात आली. सकाळी अंबरनाथ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सोनावले येथे उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ  जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच भिवंडी तालुक्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आरोग्य व बांधकाम सभापती वंदना भांडे यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ झाला. 


ग्रामीण भागातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड या तालुका क्षेत्रांमध्ये ही लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे एकूण १ लाख ७४ हजार ५०२ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी ९२ हजार २६३ बालकांना डोस पाजण्यात आला. म्हणजे हे काम ८९ टक्के पूर्ण करण्यात आले. उर्वरीत लसीकरण आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पुढील तीन ते चार दिवसात करण्यात येणार आहे. 


याप्रसंगी सोनावला येथे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी  डॉ.अंजली चौधरी,  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना गरुड तसेच आरोग्य सहाय्यक  राजेश राठोड, आरोग्य सहाय्यिका  एस टी मोरे,  समुदाय आरोग्य अधिकारी गोकर्ण कांबळे उपस्थित होते. तर पडघा येथे भिवंडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भोर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments