गरिबाच्या उध्वस्त झोपड्यातून सामानाची चोरी मुद्देमालासह चोरट्यावर झडप


डोंबिवली  ( शंकर जाधव ) कल्याण जवळच्या कचोरे गावातील न्यू गोविंदवाडीतील पाईपलाईन रोडला झोपडीत राहणाऱ्या रतन त्रिंबक ढालवाले (62) या गरीब मजुरावर भयंकर प्रसंग गुदरला आहे. शुक्रवारी रात्री पाऊस पडल्यामुळे या वृद्ध मजुराची झोपडी पूर्णपणे तुटून पडली. झोपडीतून चोरलेल्या सामानासह पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केले आहे.
   

पावसात या गरीबाची झोपडी पूर्णपणे उध्वस्त झाली. ही संधी साधून कुणीतरी चोरट्याने सदर झोपडीतील उघड्यावर पडलेले घरसामान चोरून नेले. या सामानाची किंमत जरी 11 हजारांच्या घरात असली तरी गरिबासाठी त्याची किंमत लाख मोलाची ठरली जाते. या वृद्धाने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपली कैफियत मांडली असता पोलिसांनी त्यांना मदतीचा हात देण्याची तयारी दर्शवत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.


या प्रकरणाचा तपास करताना जमादार रमेश चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहीम राबवून त्याच परिसरातील भारतनगरमध्ये राहणाऱ्या नासीर हुसेन पठाण (30) नामक बदमाश्याच्या नाड्या आवळल्या. या चोरट्याकडून वृध्दाच्या झोपड्यातील चोरलेले सर्व सामान हस्तगत केल्याचे जमादार रमेश चौगुले यांनी सांगितले.


तसेच पावसामुळे पूर्णतः भुईसपाट झालेली या वृद्धाची झोपडी पूर्ववत उभी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निमित्ताने पोलिसांतील माणुसकीची दर्शन घडल्याची भावना परिसरातील रहिवाश्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments