ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मॅरेथॉन बैठका पार


डोंबिवली ( शंकर जाधव )  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुधीर  पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डोंबिवली पूर्वेकडील गोळवली मधील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागाच्या बैठका पार पडल्या.यात ठाणे जिल्हा कार्यकारणी, भिवंडी ग्रामीण तालुका, कल्याण ग्रामीण तालुका, शहापूर तालुका,  मुरबाड तालुका, अंबरनाथ ग्रामीण तालुका, अंबरनाथ शहर व विधानसभा, वांगणी शहर, कल्याण डोंबिवली जिल्हा या सर्व बैठका घेण्यात आल्या.

   
बैठकीत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ व्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिल्या. त्याचबरोबर नवीन सदस्य नोंदणी, बुथ कमिटी, आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. १५ जून पासून ठाणे जिल्हा युवक संवाद यात्रेनिमित्त ठाणे जिल्ह्यात संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे युवक मेळावा होणार असून त्यानिमित्त विभागवार झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.


१० जूनला पक्षाचा २३ वा वर्धापन दिन असून प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब व युवक अध्यक्ष मेहबूबजी शेख यांच्या सूचनेप्रमाणे ८ जूनपर्यंत सभासद नोंदणी अभियान राबवणे. १० जून रोजी पक्ष कार्यालयात झेंडावंदन करून कार्यकर्ता मेळावा घेणे. तसेच १० जून ते १६ जून वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, जेष्ठ नागरिक सन्मान, पर्यावरण विषयक जनजागृती अशा अनेक कार्यक्रम घेण्याबाबत युवकांना सूचना देण्यात आल्या.

   
या बैठकीत ठाणे जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी श्रेयस वेखंडे, हर्षद शेळके, विनय मिश्रा, युवराज गिध, शाम सूर्यवंशी, मिलिंद जाधव, सुनील पाटील यांनी अध्यक्ष सुधीर पाटील यांच्याकडे आगामी निवडणुका युवकांना संधी द्यावी व ग्रामीण भागात राष्ट्रवादी युवक तर्फे निधीसाठी मागणी करावी अशी विनंती केली. भिवंडी ग्रामीण तालुक्यातील बैठकीत तालुका अध्यक्ष पुंडलिक पाटील व महासचिव सुरज खरे यांनी सोशल मीडिया विषयी आपले मत मांडून प्रदेश कडून सोशल मीडिया शिबिरासाठी आयोजन करण्याची मागणी केली.


कल्याण तालुकाध्यक्ष अमोल जाधव व पदाधिकाऱ्यांना बुथ कमिटी विषयी मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या. शहापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संघटनात्मक बांधणी विषयी सूचना देण्यात आल्या. मुरबाड तालुका अध्यक्ष बाळू भोईर व अविनाश भोईर यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागण्याच्या सूचना देऊन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. अंबरनाथ ग्रामीण तालुका अध्यक्ष विजय काठवले व अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. तसेच वांगणी शहर संघटनात्मक आढावा घेऊन चर्चा केली. वांगणी युवक अध्यक्ष फरीद चौकर यांच्या कार्यकारिणीवर अनेक युवकांच्या नियुक्त्या केल्या. त्यानंतर कल्याण-डोंबिवली जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्हाध्यक्ष राज जोशी व कार्याध्यक्ष विश्वास आव्हाड यांना जिल्हा कार्यकारणी संदर्भात मार्गदर्शन करून नवीन पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश आणि घेण्यात आला.

 
मॅरेथॉन बैठकीत अनेक विषयांवर ठाणे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष  पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीत युवकांनी सज्ज व्हावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे मत ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष  पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments