शासनकर्त्यां बरोबरच लोकप्रतिनिधीं बाबत आगरी संघटनांनी व्यक्त केला संताप राज्यातील आगरी संघटना एकवटल्या


कल्याण : आतापर्यंत देशभरात विखुरलेल्या स्वरुपात असलेल्या समस्त आगरी समाजाच्या संघटित प्रक्रियेची मुहूर्तमेढ रोवत नुकतेच डोंबिवलीच्या प्रगती कॉलेजमधील आगरी समाज सभागृहात महाराष्ट्रातील तमाम आगरी संस्था - संघटना एकवटल्याने प्रथमच समाजाच्या विराट शक्तीचे दर्शन घडले. संमेलनात राज्यभरातील शे-सव्वाशे संघटनांचे प्रमुख, व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.  अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने या संमेलनाचे आयोजन केले होते.  यावेळी शासनकर्त्यांबरोबरच लोकप्रतिनिधींबाबत आगरी संघटनांनी संताप व्यक्त केला.


आज आगरी समाज उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा राहिला आहे. त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन असलेल्या शेतजमिनी संपादित करुन त्याला आपल्या मायभूमीतून बेदखल करण्याचा सपाटा लावला जात आहे. त्यांच्या छाताडावर परप्रांतीयांचे लोंढे आणून त्याला पायदळी चिरडण्याचा प्रयास केला जात आहे. अनधिकृत झोपड्यांना संरक्षण देत आमच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांवर मात्र हातोडा मारला जात आहे.


पर्यावरणाच्या नावाखाली शेतजमिनींचा मालकी हक्क संपुष्टात आणला जात आहे. या जुलमी आणि अत्याचारी कृत्याचा पाप सरकारला भोगायला लावल्याविना आगरी समाज स्वस्थ बसणार नाही. असा निर्वाणीचा इशारा अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी संस्थांच्या महासंमेलनातून दिला आहे.                    

 

शासनकर्त्या बरोबरच समाजाच्या लोकप्रतिनिधींवरही समाज कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी प्रकट करत कडाडून टीका केली. समाजाची वाताहत होत असतांना, त्यांचं नामोनिशाण मिटले जात असताना, त्यांचं अस्तित्व टिकविण्यासाठी या मंडळींकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्याबाबत आवाज उठविला जात नाही. या त्यांच्या बेपर्वा आणि उदासीन भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकीय स्वार्थाची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागेल. असा इशाराही अनेक संस्थांच्या नेत्यांनी यावेळी बोलताना दिला.                                                          

राजकीय स्वार्थाची गणितं मांडतांना जन्मदात्या समाजापासून अलिप्त राहण्याची कातडी बचाव भूमिका ही राजकारण्यांच्या अंगलटी येणार आहे. कारण समाजाची मते देखील निर्णायक ठरणारी आहेत. परंतु अलिकडे त्यांना याचा परस्पर विसर पडलेला दिसत आहे. जर समाजिची कड घेणे राजकीय नेत्यांना अपराधीपणाचे वाटत असेल तर परक्याचे या भरोशावर राजकारण करण्याचा सल्ला देत समाजाच्या सर्वच संघटनांनी ठेंगा दाखवला आहे. अशा कडवट प्रतिक्रियांची कोणत्या सावध प्रतिक्रिया राजकारण्यांकडून उमटतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.                                                                                        

माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महासंमेलनाच्या व्यासपीठावर अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील, नवी मुंबईतील ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष अॅड. पी. सी. पाटील, मा. मंत्री स्व. नकुल पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील, आगरी युवक संघटनेचे संस्थापक रविंद्र नाईक, सेवाभावी डॉ ‌ सिध्दार्थ पाटील, वसंत पाटील तसेच संमेलनाला आगरी सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख चंद्रकांत ठाणकर, पुणे जिल्हा आगरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश पाटील, कामगार नेते प्रफुल्ल म्हात्रे, वंदना गौरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी केले तर आभार एस. पी. पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments