काळातलाव परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

मनसेच्या महिला शिष्टमंडळाचे पालिकेसह पोलीस प्रशासनाला निवेदन


कल्याण : कल्याण पश्चिमेतील काळातलाव परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कदम यांच्या नेत्तृत्वाखाली  शिष्टमंडळाने पालिकेसह पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून काळातलाव परिसरात सायंकाळच्या वेळेत प्रेमी युगुल ठिकठिकाणी बसून सर्वासमक्ष अश्लील चाळे करत असतात. आबालवृद्धांचं मनोरंजन व्हावं, त्यांना मोकळ्या हवेत फेरफटका मारला यावा तसेच कुटुंबातील व्यक्तींना एकत्र बसता यावे यासाठी काही वर्षांपूर्वी काळातलावाचे सुशोभीकरण करण्यात आले.


        तेव्हापासून परिसरात फेरफटका मारणाच्यांची संख्या वाढतच आहे, मात्र सायंकाळच्या वेळेत तेथे प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे पाहून महिलांना खाली मान घालून चालावे लागत आहे. तेथील सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी ठरत आहे, त्यांनी फेरफटका मारून अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांना अटकाव करायला हवे, परंतु तसे होताना दिसत नाही, त्यामुळे तेथील सुरक्षा कर्मीदेखील बघ्याचीच भूमिका घेत आहेत.


       त्यामुळे याकामी जातीने लक्ष देऊन काळातलाव परिसरात अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी गुगुलांवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने पालिका आयुक्त तसेच पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कदम शहर अध्यक्षा शीतल विखणकर, उप जिल्हाध्यक्षा रेणुका शिरोडकर, जिल्हा सचिव वासंती जाधव, जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments