सम्राट अशोक विद्यालयात ढोल - ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
कल्याण : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाला खऱ्या अर्थाने १५ जून पासून सुरुवात झाली असून पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालयात ढोल-ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या वर्गांना प्रवेश घेतला आहे.
शिक्षकांनी रांगोळी काढून पताके फुगे लावून शाळेचे प्रवेशद्वार व वर्ग सजावट केलेली होती. विद्यार्थी आल्यावर गुलाब पुष्प देऊन शिक्षकांनी स्वागत केले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दिवे प्रज्वलित करून केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांबरोबर खेळायचे साहित्य मुलांच्या हाती देऊन आनंदायी शिक्षण दिले जाईल असा शाळेने संदेश दिला.
शाळेचा पहिला दिवस असूनही ८५ टक्केपेक्षा अधिक उपस्थिती होती. शाळा नियमित सुरू झाल्यामुळे मुलांबरोबर पालकही आनंदी दिसत होते. असे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शैक्षणिक वर्षाचे स्वागत करत असताना विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही आनंद घेतला.
0 Comments