ब्रह्मांड संगीत कट्टयाचा तिसरा वर्धापनदिन ठाणेनगरीत मोठेया उत्साहात साजरा


ठाणे, प्रतिनिधी : संगीतक्षेत्रात मनोरंजन तसेच शैक्षणिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टा उभारण्यात व प्रगतीपथावर नेण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते म्हणजे संगीत कट्टयाचे अध्यक्ष श्री.अरुण दळवी. कलेची आसक्ति बाळगणारा, वय व्याधी याची बंधने झुगारुन आजही  रसिकांना आपल्या कलेद्वारे आनंदी करण्यासाठी धडपडणारा , वडीलकीच्या मायेने संगीत कट्टयाच्या सर्व सदस्यांना प्रेमाच्या बंधनात एकत्र बांधुन ठेवणारा ज्ञानाचा स्त्रोत व चिरतरुण अवलिया म्हणजे श्री. दळवी. दळवी यांच्या जन्मदिन व संगीत कट्टयाच्या तिस-या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 5 जून रोजी स्वर्गीय दादा कोंडके ऍम्फिथिएटर ठाणे येथे 'आवो हुजूर तुमको' हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, ओ.पी.नय्यर व आर्. डी. बर्मन यांच्या अविस्मरणीय गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे संगीत कट्टयाच्या गायक कलाकारांनी दळवी यांना कट्टयाच्या वतीने मानवंदना दिली.


याप्रसंगी ब्रह्मांड कट्टयाचे संस्थापक श्री. राजेश जाधव, अध्यक्ष महेश जोशी, ठाणे मा. महापौर माननीय श्री. नरेश म्हस्के, ठाणे शहर आमदार माननीय श्री. संजय केळकर आदि मान्यवर उपस्थित होते. दळवी यांच्या ब्रह्मांड कट्टा तसेच ब्रह्मांड संगीत कट्टयासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना ब्रह्मांड कट्टयातर्फे मा. महापौरांच्या हस्ते जीवनगौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 


या सांंगितीक मैफिलीत शीतल यांनी 'शिशा हो या दिल हो', स्नेहल यांनी आओ हुजूर तुमको', मंगला यांनी ' जाने क्याबात है', नीलम यांनी 'वो हसीन दर्द', मीरा यांनी उई माँ उई माँ' अशा दर्जेदार गीतांनी रसिकांची मने जिंकली. 'कुछ ना कहो', 'मै आया हूँ लेके', 'दर्दे दिल',  'क्या हुआ तेरा वादा', 'लाखो है निगाहों मे' ही गीते अनुक्रमे डॉ. शरद, संदीप, सचिन, अभिजीत, हेमंत या गायकांनी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध  केले. 


त्याचबरोबर विविध धाटणीच्या द्वंद्वगीतांचा खजिना उलगडत कलाकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. अभिजीत मीरा यांनी 'रिमझिम गिरे सावन', संदीप स्नेहल यांनी 'करवटे बदलते रहे', हेमंत मंगला यांनी ' मांग के साथ तुम्हारा', अभिजीत मंगला यांनी 'दिवाना हुआ बादल', सचिन मीरा यांनी ' रिमझिम रिमझिम', डॉ. शरद नीलम यांनी 'तुमसे मिलके', डॉ. शरद व शीतल यांनी 'जाने जा', सचिन नीलम यांनी 'हम दोनो दो प्रेमी', संदीप शीतल यांनी 'हवा के साथ साथ', हेमंत स्नेहल यांनी 'ओ हसीना जुल्फोवाली' अशी बहारदार द्वंद्वगीते सादर करुन रसिकांच्या मनावर जादू केली.


 कार्यक्रमाची सांगता अप्रतिमरित्या गुंफलेल्या गीतांच्या मेडलीने झाली. सोनाली पाठक यांनी सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. अशाप्रकारे आपल्या या लाडक्या प्रेरणास्थानाला प्रेममयी सांगितिक शुभेच्छा देत रसिकांनी श्री. दळवी यांचा जन्मदिन व वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पाडला.

Post a Comment

0 Comments