थक बाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करावी जहानी कमी करा; सहव्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्रकांत डांगे (भाप्रसे) यांचे निर्देश


कल्याण: दि. २१ जून २०२२  :  वीजबिल थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित होण्यास पात्र असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार आणि तत्काळ खंडित करावा. वीजबिल वसुलीच्या कामाला गती देण्यासोबतच वीज वितरण हानी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सक्त निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) यांनी दिले आहेत.


महावितरणच्या कल्याण परिमंडलांतर्गत कल्याण एक आणि दोन मंडल कार्यालयांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले, सेवा खंडित होण्याच्या भितीमुळे मोबाईल, डिश टिव्ही यासारख्या सेवांचा मोबदला तातडीने भरला जातो. मात्र, मुलभूत गरज असणाऱ्या व या सेवा ज्या विजेवर अवलंबून आहेत त्या विजेच्या वापराचा परतावा वेळेत मिळत नाही.


त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई प्रभावीपणे राबवावी व ग्राहकांना विहित मुदतीत वीजबिल भरण्याची सवय लावावी. ग्राहकांनी वापरलेल्या वीजबिलाचा परतावा वेळेत मिळाला तरच महावितरणला वीज खरेदीचा खर्च, पारेषणचे भाडे, अखंडित वीज सेवा देता येणे शक्य आहे. त्यामुळे चालू वीजबिलासह थकबाकी वसूलीला दुसरा कोणताही पर्याय नाही. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांसह पाणी-पुरवठा योजना, पथदिव्यांच्या जोडण्यांची चालू वीजबिले दरमहा भरून घ्यावीत. अन्यथा त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले.


शंभर टक्के अचूक वीजबिलासाठी मीटर रीडिंग एजन्सीच्या कामाच्या पडताळणीत नियमितता ठेवावी. तसेच मुख्य कार्यालयाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार वीज वितरण हानी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी दिले.


या बैठकीला कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रणाली विश्लेषक रंजना तिवारी यांच्यासह कल्याण पूर्व अणि पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर एक आणि दोन विभाग कार्यालयांचे कार्यकारी अभियंते, त्याअंतर्गत सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments