ओबीसींच्या पॅनलसाठी एकच निवडणूक चिन्ह द्या! ओबीसी एकीकरण समितीची मागणी


ठाणे (प्रतिनिधी)-   ओबीसींना आरक्षण देण्याबाबत ठोस निर्णय होत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांकडून ओबीसींना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्याची शक्यता मावळली आहे. या पार्श्वभूमीवर जर ओबीसींनी आपले पॅनल तयार करुन निवडणूक लढविल्यास त्यांना विशेष सूट म्हणून तिन्ही उमेदवारांना समान चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे केली आहे. 


ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक तथा ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेल की नाही, याबाबत साशंकताच आहे. परिणामी, सामाजिक कार्य करणार्‍या ओबीसी बांधवांना राजकीय क्षेत्रात यश मिळविणे अवघड होणार आहे. ठाणे शहरात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाणे महानगर पालिका निवडणुकीत ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी अपक्ष ओबीसी उमेदवारांना पुरस्कृत करण्याचा विचार करीत आहे.


याचा विचार करता, जर अपक्षांनी स्वतंत्रपणे पॅनल तयार केले तर त्यांना समान निवडणूक चिन्ह देण्यात यावे; तसेच, ठाणे ओबीसी एकीकरण समिती ही बिगर राजकीय संघटना असल्याने पक्षांप्रमाणे एबी अर्ज देणे गैरलागू ठरत असते. मात्र, समान चिन्ह देणेसाठी ओबीसी एकीकरण समितीने पुरस्कृत करण्याचे पत्र दिल्यास एका प्रभागातील संबधित तिन्ही अपक्ष उमेदवारांना समान निवडणूक चिन्ह द्यावे,  अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments