ब्रह्मांड कट्टयावर सजली बहारदार काव्य मैफिल

 


ठाणे, प्रतिनिधी : सामाजिक सांस्कृतिक चळवळीतील अग्रेसर ब्रह्मांड कट्टयाने त्यांंच्या मासिक कार्यक्रमांच्या मंदियाळीत बहारदार काव्यमैफिलीचा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.  रम्य पावसाळी वातावरणात आपल्या काव्यसरींमध्ये चिंब करण्यासाठी दिनांक 19 जुुन 2022 रोजी सांज स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड येथे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवि श्री. विजय जोशी (डोंबिवली), कवयित्री सौ. चैत्राली जोगळेकर (मुंबई) व सौ. मानसी चापेकर ( रायगड) या त्रयींनी 'ओंजळीतील शब्दफुले' हा दर्जेदार काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर केला.


या कार्यक्रमाचा 50 वा सुवर्णमहोत्सवी प्रयोग ब्रह्मांड कट्टयावर साजरा केला गेला. ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री. राजेश जाधव, सचिव सौ. स्नेहल जोशी व खजिनदार सौ. प्रगती जाधव यांनी मान्यवर कलाकारांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन स्वागत केले. अध्यक्ष श्री. महेश जोशी यांनी कविंची ओळख करुन दिली. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्रह्मांड कट्टा परिवाराच्या ज्येष्ठ नागरिक सदस्या सौ. सुहासिनी भालेराव यांचे मान्यवर कविंच्या हस्ते अभीष्टचिंतन करण्यात आले. ब्रह्मांड कट्टा स्थानिक कलाकारांना कला सादर करण्याची संधी देत असते. या सत्रात हेमंत मयेकर व शीतल बोपलकर यांनी गीते सादर केली. ब्रह्मांड कट्टा जनसंपर्क अधिकारी व ब्रह्मांड कट्टा कलासंस्कार सचिव कवयित्री ऋजुता देशपांडे यांनी काव्यमैफिलीच्या अनुषंगाने विरहरस व शृंगाररस  दर्शविणा-या स्वरचित कविता सादर केल्या. तसेच ज्येष्ठ कवयित्री किरण बर्डे यांनी आयुष्याची सकारात्मकता उलगडणारी सुंदर कविता सादर केली. 


मान्यवर कविंनी वैचारिक विषय हाताळणा-या, हलक्याफुलक्या तसेच उत्कट भावनाप्रधान अशा वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या. प्रेक्षकांशी ओघवता संवाद साधत आयुष्य, सामाजिक परिस्थिती, नातेसंबंध अशा कविता तिन्ही कविंनी सादर केल्या. चैत्राली यांची सीमेवर लढणा-या सैनिकाच्या पत्नीचे पत्र व बाबा या कवितांनी रसिकांना हळवे केले. मानसी यांच्या आपल्या घराविषयी ओढ दर्शविणारी कविता तसेच घरकामात मदत करणा-या मावशींविषयी आत्मियता दाखवणारी कविता अशा काव्यांनी प्रेक्षकांंचे डोळे पाणावले.


जोशी यांच्या अनेक काव्यांपैकी शाळेेची घंटा या काव्याने व खास लयबद्ध मालवणी भाषेतील कविता सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. कविचे मनोगत या काव्यातुन जोशी यांनी जणु समस्त कविवर्गाचे भावविश्वच उलगडले. याप्रसंगी नवोदित कविंना जोशी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास रसिक काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments