कल्याण : शहरांमध्ये वडाच्या झाडांची संख्या कमी असल्याने वटपौर्णिमेला अनेक वेळा वडाच्या फांद्या तोडून वडाची पूजा केली जाते. हे टाळण्यासाठी कल्याणमध्ये शिव आदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना गटप्रमुख निलेश भोर यांच्यावतीने प्रभाग क्रमांक ३ गोदरेज हिल, गौरीपाडा, बारावेगाव येथील विविध गृहसंकुलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले असून वटपौर्णिमेच्या दिवशी हि वडाची रोपे गृहसंकुलांमध्ये लावण्यात येणार आहेत.
नुकतेच झालेले मान्सूनचे आगमन व वटपौर्णिमेच्या निमिताने प्रभागात वट वृक्ष रोपणाचा उपक्रम शिव आदेश प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत आहे. वट वृक्ष हे २४ तास प्राणवायू मोठ्या प्रमाणात देत असतो. तसेच इतर अनेक फायदे वट वृक्षाचे आहेत. प्रत्येक सोसायटीच्या मोकळ्या जागेत एक वडाचं झाड रोपण करण्याचा संकल्प शिव आदेश प्रतिष्ठानने केला आहे.
काही दिवसापासून कोव्हीड १९ रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे तेव्हा खबरदारी म्हणून येत्या वट पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सोसायटी मधील माता-भगिनी रोपण केलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करतील तसेच वट पूजनासाठी होणारी गर्दी टाळून आपल्या माता भगिनिंचे आरोग्य सुरक्षित राहील.
प्रभाग क्रमांक ३ गोदरेज हिल, गौरीपाड़ा, बारावेगाव, या प्रभागातील सुमारे ५०० वडाची रोपे लावण्याचा मानस असून जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शिव आदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भोर यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
0 Comments