पहिल्याच पावसात केडीमसीच्या नालेसफाईची पोलखोल शहाड परिसरात साचले पाणी


कल्याण  : गुरुवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने गेल्या दोन महिन्यांपासून  नकोशा केलेल्या उकाड्यावर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला. तरी केडीएमसीने नालेसफाईचे केलेले दावे मात्र या मान्सूनपूर्व पावसात धुवून निघालेले पाहायला मिळाले. कल्याणजवळील शहाड परीसरात साचलेल्या पाण्यामुळे  महापालिकेच्या या नालेसफाईवर आणि त्याच्या करण्यात आलेल्या  दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


कल्याण मुरबाड रोडवर पौर्णिमा टॉकीजकडून शहाडकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला. परिणामी इथल्या वाहतुकीला त्याचा फटका बसून मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. तर शहाडकडून आंबिवलीकडे जाणारा मार्ग पाणी सचल्याने  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक नागरिक रस्त्यावर साचलेल्या या गुडघाभर पाण्यातून घरची वाट काढताना दिसून आले. 


अद्याप पावसाळा नीटसा सुरूही झालेला नसून आजचा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. यातच जर सखल भागात अशी अवस्था होणार असेल तर या ट्रेलरवरून आगामी पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती आणखी भयंकर असेल.


तर पावसाळा सुरू झाल्यावर वालधुनी नदी किनारी राहणारी जनता चिंताग्रस्त होते. येथिल भवानी नगर, योगी धाम परिसर, बंदरपाडा या भागात पूर येणे हे नित्याचेच झाले आहे. पूर येतो आणि जनतेचे अतोनात नुकसान करून जातो. हे आता जनतेच्या अंगवळणी पडले आहे. पूर येण्याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्याचे सोडून. महापालिका प्रशासन आणि तत्कालीन लोकप्रतिनिधी हे पूर येण्यास हातभार लागावा, अशा स्वरूपाची कामे करण्यात धन्यता मानीत आहेत.


याचे उत्तम उदाहरण म्हणजे करोडो रुपये खर्ची घालून,नदी पात्रात भरणी घालून उभा राहत असलेला सिटी पार्क प्रकल्प होय. वालधुनी नदी स्वच्छतेबाबत  वालधुनी नदी क्षेत्रातील ईतर महापालिका जसे उल्हासनगर ,अंबरनाथ शहरातील प्रशासन नदी स्वच्छ व्हावी, अतिक्रमण मुक्त व्हावी म्हणुन जी मेहनत घेत आहेत. त्यामानाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका व येथिल लोकांमधून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी हे याबाबत कमालीचे उदासीन दिसून येत आहेत.


याचाच परिपाक शहाड जकात नाका परिसरात पहिल्या पावसाळ्यात एवढे पाणी साठून जनजीवन विस्कळित झाले आहे. या परिसरात नदी किनारी मोठ मोठी कॉम्प्लेक्स उभी राहत आहेत. त्यांनी देखिल पावसाळी पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक प्रवाह बाधित केलेत का? याची देखिल या निमित्ताने चौकशी व्हायला हवी. हा संपूर्ण पूरग्रस्त भाग आता एका प्रभागात जोडला गेल्याने भविष्यात प्रभाग क्रमांक 4 येथून निवडून येणारे लोकप्रतिनिधी यावर काय उपाययोजना करणार आहेत.


 येथिल बैठे भाग पुनर्विकसित करण्यासाठी त्यांची काय योजना आहे. वालधुनी नदीतील गाळ काढून नदी स्वच्छ कधी होणार? येथिल जनतेने मतदान करण्याअगोदर या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. नाहीतर पाठीला तवा बांधुन फिरण्याचे शुक्लकाष्ठ कधीच संपणार नाही अशी भीती कल्याण पश्चिम वालधुनी स्वच्छता समितीने व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments