केमिस्टने टीबी मुक्त मोहीम यशस्वी करावी - सहाय्यक आयुक्त आर. पी. चौधरी यांचे आवाहन


डोंबिवली ( शंकर जाधव )  सामाजिक जवाबदारी जाणून केमिस्टने टीबी मुक्त भारत मोहीमेसाठी सहकार्य करून ती यशस्वी करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त आर. पी. चौधरी साहेब यांनी केले. डोंबिवली मेडिकल केमिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे वतीने औषध विक्री नियम व तरतुदी यावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.


मार्गदर्शन कार्यशाळेला अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक नितीन आहेर आणि संदीप नरवणे यांची प्रमुख अतिथी म्हणून तर संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे, निलेश वाणी, राजेश कोरपे, महेंद्र चोप्रा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


यावेळी बोलताना आर.पी. चौधरी यांनी सांगितले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून औषध विक्री केली पाहिजे. देशाला टीबी मुक्त करण्याच्या अभियानात केमिस्ट ची महत्वाची भूमिका आहे. टीबी रुग्णाची माहिती उपलब्ध झाल्यास योग्य उपचाराने त्याचे संक्रमण आपल्याला थांबवता येईल. त्याच प्रमाणे दुकानाच्या विक्री भागात आपण सीसीटीव्ही चे निर्देश केंद्राने दिले आहेत त्यावर देखील अंमल करावा.


 युवा पिढीचे आपण रक्षण कर्ते बनून डोंबिवली पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाईल असे कार्य करण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले. औषध निरीक्षक नितीन आहेर यांनी सीसीटीव्ही चे महत्व पटवून सांगितले तर संदीप नरवणे यांनी औषध विक्री करतांना घेण्याची काळजी यावर मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केले तर केमिस्ट च्या समस्या निलेश वाणी यांनी यावेळी मांडल्या. आभार सचिव विलास शिरुडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments