डोंबिवलीत उद्यानासाठी वाचविण्यासाठी लहान मुलांसह नागरिकांचे मानवी साखळी आंदोलन


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच उद्याने असल्याने पालिकेच्या या धोरणावर नागरिक नाराज झाले आहेत. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवरच उद्यानच झालं पाहिजे, आमच्या मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठाना बसण्यासाठी उद्याने हवीत पण उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर भूमाफियाने केलेले  अतिक्रमण हटवा .


उद्यानाच्या बाजूला असलेला नाट्यकट्टा सुरू करा या मागणीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीही होत नसल्याने अखेर लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग , परिसरातील नागरिक , स्थानिक भाजप नगरसेवक मुकुंद ( विशु ) पेडणेकर यांनी उद्यानासाठी राखीव असलेल्या आरक्षित भूखंडावर मानवी साखळी उपोषण केले.
 

 मागील चार वर्षांपासून उद्यानासाठी आरक्षित जागेवर एका विकासकाने कब्जा  केला असून या जागेवर सेल ऑफिस उभारले आहे तर एका बाजूने सोसायटीसाठी या उद्यानाच्या जागेतून रस्ता तयार करत आधीच भूमाफियाने जागा बळकावली असून आता दुसऱ्या बाजूने इमारत उभारण्यासाठी चे काम सुरू केले आहे स्थानिक नगरसेवकाने याला विरोध करत या आरक्षित जागेवर उद्यान उभारले जावे यासाठी मागील ४ वर्षांपासून पाठपुरावा केल्या नांतरही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या हक्काच्या जागेसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत मानवी साखळी करत आंदोलन केले.


 शहरातील मोकळ्या भूखंडावर कबजा करत भूमाफिया अनधिकृत टोलेजंग इमारती उभारत आहेत. करदात्या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती बांधल्या जात असल्याने नागरिकांचे हक्क हिरावले जात आहेत. डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रेनगर परिसरात उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या दहा गुंठे भूखंडावर भूमाफियांने कब्जा करत पत्र्याचे कुंपण घालून उद्यानाची जागा लाटण्याचा प्रयत्न केला आहे. 


आरक्षित भूखंडाला लागून असलेल्या भूखंडावर विकासकाने इमारतीचा घाट घातला असून आरक्षित भूखंडॉवर देखील कबजा केला आहे . पत्र्याचे कुंपण घालून या विकासकाने हा भूखंड ताब्यात घेतला असून पालिकेच्या निधीतून या भूखंडाच्या कोपऱ्यात बांधलेला नाट्य कट्टाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.  या परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी विरंगुळ्यासाठी जागा नसल्याने या  जागेवर उद्यानच तयार केले जावे  या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी साखळी आंदोलन केले.


स्थानिक नगरसेवक मुकुंद ( विशु) पेडणेकर यांनी आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटवून या जागेवर उद्यान तयार करण्याची मागणी मागील ४ वर्षांपासून चालवली आहे. मात्र प्रशासनाकडून विकासकाची पाठराखण करत मोक्याच्या जागेवरील भूखंड भूमाफियाला दान करण्याचा प्रशासनाचा घाट सुरू असल्याचा आरोप  यावेळी  केला.
 

चौकट


उद्यान हे नागरिकांचे हक्काचे ठिकाण असते.मात्र उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना लोकशाही मार्गाने मानवी साखळी आंदोलन करण्याची वेळ आली.नागरिकांच्या आंदोलनाची दाखल पालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी घेऊन लवकरात लवकर सदर ठिकाणचे अतिक्रमण हटवावे अशी नागणी जोर धरू लागली आहे.

Post a Comment

0 Comments