गरीब व्यावसायिकांच्या हातगाड्या दोन दिवसात पूर्ववत करून द्या - माजी आमदार नरेंद्र पवार

■पारनाका परिसरातील हातगाड्यांवर कारवाई केल्याने माजी आमदार नरेंद्र पवार संतापले


कल्याण : पारनाका परिसरातील हातगाड्यांवर कारवाई केल्याने माजी आमदार नरेंद्र पवार संतापले असून गरीब व्यावसायिकांच्या हातगाड्या दोन दिवसात पूर्ववत करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पारनाका परिसरातील गरीब हातगाडा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यांच्या व्यवसायाच्या मालासहित त्या गाड्या जेसीबीने उध्वस्त केल्या आहेत. मनपाच्या रीतसर पावत्या फाडून लागणाऱ्या गाड्या कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यात आल्या. यामध्ये काही गाड्या सुरू नसतानाही बाजूला लावलेल्या गाड्या जेसीबीने उध्वस्त केल्या आहेत.

 
यामध्ये ताम्हणकर यांची वडापाव व कचोरीच्या गाडीवर बंद असतानाही कारवाई केली आहे. या तात्काळ दोन दिवसात पूर्ववत करून त्यांना न्याय द्या अन्यथा उग्र आंदोलन करू असा इशारा माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिला आहे.


या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाने काल कारवाई केल्यानंतर तातडीने सदर ठिकाणी भेट देऊन नरेंद्र पवार यांनी कारवाईची पाहणी केली, तसेच ज्यांच्या हातगाड्या उध्वस्त केल्या आहेत त्यांच्या भेटी घेऊन तातडीने आयुक्त सूर्यवंशी, उपायुक्त अनंत कदम यांच्याकडे मागणी केली आहे. ही कारवाई वॉर्ड ऑफिसर सुधीर मोकल यांनी केली आहे.


या गरीब हातगाड्या व्यावसायिकांना त्रास देऊन काय साध्य होणार नाही, केवळ कुणाच्या तरी सांगण्यावरून ही कारवाई सुरू आहे, मागच्या वर्षीही अशीच कारवाई केली होती, त्यांना मी स्वतः गाड्या दिल्या होत्या, यावेळी सुद्धा महानगरपालिकेने निर्दयीपणे जेसीबीने कारवाई केली आहे, त्यांना तातडीने दोन दिवसात हातगाड्या पूर्ववत करून द्या अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन उभारू असे मत यावेळी नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments