आन आणि मान ठाकूर हुतात्मा बंधूंना डोंबिवलीत अभिवादन


डोंबिवली ( प्रतिनिधी )  स्वराज्य लढाईतील वसई किल्ला विजयातील हुतात्मा आन ठाकूर आणि मान ठाकूर बंधूंचा गुरूवारी 283 वा स्मृतीदीन होता. आन आणि मान ठाकूर हुतात्मा बंधूंच्या हौतात्म्यदिनाचे औचत्य साधून आगरी समाज प्रबोधन संस्थेतर्फे या बंधूंना विनम्र अभिवादन करणारा सोहळा पार पडला.
  
  
यावेळी त्यांचे वंशज समीर पाटील, दीपक ठाकूर व जगदीश ठाकूर यांच्यासह स्थानिक नगरसेवक जनार्दन म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे, एकनाथ म्हात्रे, जोंधळे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मगन सूर्यवंशी, आगरी समाज प्रबोधन कार्यकर्ते पद्माकर पाटील, दयानंद म्हात्रे, राम म्हात्रे, संजय पाटील, नागेश पाटील, प्रीतम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू धुळे, निरंजन भोसले, उदय शेट्टी, प्रशांत शिंदे, वैभव मोरे, आदींनी मानवंदना दिल्या.
    

 स्वराज्याच्या लढाईतील वसईचा संग्राम आणि त्या विजयात ऐतिहासिक सोनेरी पान कोरणारे हुतात्मा आन ठाकूर आणि हुतात्मा मान ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. ज्यांच्या ताब्यात समुद्र त्याच्या हातात सत्ता हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्व विर संभाजी महाराजांनी जाणले होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचे शुर सेनानी थोरले बाजीराव पेशव्यांच्या मदतीने ई. स. 1700 काळात पोर्तुगीजांचे रयतेवरील अत्याचारांबाबत त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ला जिंकण्याची मोहीम हाती घेतली. 


90 आधुनिक पोर्तुगीज तोफा या किल्ल्यावर आग ओतण्याकरिता सज्ज होत्या. किल्ला पाण्यात असल्या कारणाने सदर किल्ला कुणाला जिंकता येत नव्हता. स्वराज्यासह धर्मावर आलेले गंडांतर रोखण्यासाठी चिमाजी अप्पांनी विडा उचलला. 17 फेब्रुवारी 1739 रोजी वसई किल्ल्यात घनघोर युद्ध सुरू झाले. पराक्रमी चिमाजी अप्पांनी डोंबिवलीतील आन आणि मान ठाकूर यांच्यावर जबाबदारी सोपवली.


 3 मे 1739 रोजी अमावस्येला आन आणि मान ठाकूर बंधूंनी रात्रीच्या काळोखात पोहत किल्ल्याच्या बुरुजाशी जाऊन सुरुंग पेरले. सुरुंगांचा विस्फोट झाला. बुरुज पडल्यानंतर मावळ्यांनी किल्ल्यात घुसून तुफान युद्ध केले. पोर्तुगीजांकडून किल्ला काबीज केला आणि युद्ध जिंकले. 


परंतु आन आणि मान ठाकूर बंधू त्या युध्दात हुतात्मे झाले. अश्या निधड्या छातीचे डोंबिवलीतील 2 तरुण हुतात्मा झाल्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देत डोंबिवलीकरांनी गुरूवारी विनम्रपणे अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments