अभिनय कट्ट्यावर शोध कलाकारांचा मोहिमे अंतर्गत मोफत अभिनय प्रशिक्षणाच्या माध्यमातून ४५ ते ८१ वयोगटातील कलाकारांचे विविध कलाविष्कार :

ठाणे , प्रतिनिधी  :  अभिनय कट्ट्यावर ५२३ व ५२४ क्रमांकाच्या रविवारी   दिग्दर्शक किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली शोध कलाकारांचा या मोहिमेअंतर्गत ४५ व वरील वयोगटासाठी मोफत अभिनय व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सलग दुसऱ्या शनिवार व रविवारी घेण्यात आलेल्या या शिबिरात दोन्ही बॅचमध्ये एकूण ८० शिबिरार्थिनी सहभाग घेतला. दोन दिवसांचे हे शिबिर शारीरिक व्याधीमुळे त्रस्त असलेले, मानसिक दबावाखाली रहाणारे, मागील दोन वर्षात कोरोनामुळे वेगळ्याच नैराश्यात अडकलेले तसेच आपली आवड, ईच्छा तेव्हा काही वेगळ्या जबाबदारीमुळे पूर्ण करता आली नाही अशा सर्वांसाठी हे शिबिर घेण्यात आले.


 यात किरण नाकती यांनी सर्वाचाच स्टेजवर उभं राहून बोलण्याचा आत्मविश्वास वाढवला. तसेच प्रत्येकाच्या अंगीभूत असलेल्या स्वतःलाच माहित नसलेल्या विविध गुणांची नकळतपणे जाणीव करून दिली. नौपाडा विभागातील तसेच ठाणे शहरातील  ४५ ते ८१ अशा वयोगटातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे महान कार्य या शिबिराच्या माध्यमातून किरण नाकती यांनी केले. सुखी जीवनाचा जणू काही नविन मंत्रच प्रत्येकाला मिळाला. 


उपस्थित शिबिरार्थिंचे वेगवेगळे ग्रुप करून गणेशोत्सव, दिवाळी, होळी, लग्नाची वरात, जत्रा, वृद्धाश्रम असे विविध विषय देऊन कलाविष्कार सादर करण्यात आले. काव्यवाचन,नृत्य , वक्तृत्व अशा प्रत्येक घटकांचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करण्यात आले. या वयोगटातील तसेच अगदी ६ ते  ८५ वयोगटातील आवड  व तयारी असणाऱ्या जास्तीत जास्त इच्छुकांना भविष्यातही शोध कलाकारांचा या मोहिमेअंतर्गत अशा प्रकारच्या मोफत शिबिराच्या माध्यमातून दर शनिवार व रविवार मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती किरण नाकती यांनी दिली.

Post a Comment

0 Comments