कल्याण : साम दाम दंडभेद वापरून शिवसेनेला बदनाम करण्याचे कटकारस्थान विरोधकांचे सुरु असल्याची टीका खासदार हेमंत पाटील यांनी केली. कल्याण पूर्वेतील शिवसंपर्क अभियानात खासदार हेमंत पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
संपूर्ण राज्यात शिवसेनेने कार्यकर्ता संपर्क अभियानाला मोठ्या उत्साहात प्रारंभ केला आहे, याच अभियाना अंतर्गत कल्याण पूर्व शिवसेनेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिव संपर्क कार्यकर्ता संवाद अभियानाला उत्फुर्त असा प्रतिसाद लाभला. कोळसेवाडीतील दुर्गामाता मंदिराच्या सभागृहात सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांनी आयोजित केलेल्या या शिवसंपर्क अभियानात निरिक्षक आणि खासदार हेमंत पाटील आणि शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले.
यावेळी हेमंत पाटील यांनी सांगितले की, साम दाम दंडभेद वापरून शिवसेनेला बदनाम करण्याचे विरोधकांचे कटकारस्थान सुरु आहे. या करकारस्थानांना वेळीच गाडून ठाणे जिल्हयातील शिवसेनेची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या अधक प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यात फोफावलेल्या शिवसेनेची ताकद आजही अबाधीत आहेच, परंतु गाफील राहून चालणार नाही, आदिलशाही प्रमाणेच अमित शाहीला सुध्दा या महाराष्ट्रात गाडून टाकण्यासाठी सर्वांनी एकजूटीने कामाला लागले पाहिजे.
शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांनी सांगितले की, वयोमानानुसार जुने आणि जेष्ठ मंडळी राजकारणातून कधी ना कधी रिटायर होत असतातच परंतु त्यांची धुरा सांभाळण्यासाठी तरुणाईने पुढे आले पाहिजे. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, महिला आघाडी प्रमुख विजया पोटे, राधिका गुप्ते, बालाजी किणीकर, सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, व्याख्यात्या सुवर्णा वांजळे, रमाकांत देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या या शिवसंपर्क संवाद मेळाव्यास अनेक लोकप्रतिनिधींसह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचलन हेमंत चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार रमाकांत देवळेकर यांनी मानले.
0 Comments