भिवंडी कामतघर येथील प्रस्तावित वाईनशॉप दुकानास परिसरातून वाढता विरोध

 


भिवंडी :दि. 27 (प्रतिनिधी ) भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील कामतघर वऱ्हाळ तलाव या एकमात्र प्रेक्षणीय ठिकाण परिसरात वाईन शॉप सुरू करण्यात येत असून त्याचा स्थानिक महिला , जेष्ठ नागरीक यांना त्रास होणार असल्याने त्यास सुरू करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी स्थानिक नगरसेविका वंदना मनोज काटेकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे व नारपोली पोलीस ठाणे यांना लेखी निवेदन देऊन केली आहे .

          कामतघर येथील वऱ्हाळ तलाव समोर घर नं.
380/2 या ठिकाणी कृष्णाबाई गुरमुखदास भक्तवानी यांच्या पालिका प्रशासनाने धोकादायक म्हणून नोटीस बजावलेल्या इमारतीतील गाळ्यात कल्याण येथील वाईन शॉप परवाना स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव मंजुरी साठी घाणे उत्पादनशुल्क विभागाकडे आला आहे.


         सदर परिसरा मध्ये क्रिकेट ग्राऊंड, लॉन टेनीस ग्राऊंड, व्यायामशाळा, गणेश विसर्जन घाट, महिला व बाल उद्यान तसेच जेष्ठ नागरिकांसाठी सभागृह हॉल तसेच मंगल कार्यालय असून, या ठिकाणी दिवसभर महिला व लहान मुलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.त्यामुळे सदरील रहिवास परिसरात वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी दिल्यास परिसरातील महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार असल्याची तक्रार स्थानिक महिलांची असून त्यांचा यास विरोध आहे .


          विशेष म्हणजे सदरच्या वाईन शॉप  या दुकानाचे काम सुरु असताना संबंधितांनी बी.के.ए.एजन्सी फार्मसी कन्सल्टंसी या नावाचे बोर्ड लावले होते, परंतु चौकशी केली असता, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फार्मसी कन्सल्टंसी सूरु होणार नसल्याचे  निदर्शनास आले .


        तर भिवंडी पालिके मार्फत संबधीत मालमत्ता ही धोकादायक असल्याची नोटीस ही बजावण्यात आली असल्याची माहिती निवेदनात देत परिसरातील नागरिकांचा महिलांचा मोठ्या प्रमाणात विरोध असल्याने सदरच्या वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी देऊ नये अन्यथा स्थानिक महिला रस्त्यावर उतरून त्यास कडाडून विरोध करतील असा इशारा शेवटी नगरसेविका वंदना मनोज काटेकर यांनी दिला आहे .

Post a Comment

0 Comments