ठाणे (३१) : ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अनुसूचित जाती ( महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये ५ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती तर १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी असून, त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमाती ४२,६९८ इतकी आहे. या निवडणुकीकरीता तीन सदस्यीय प्रभाग असे एकूण ४६ प्रभाग व चार सदस्यांचा १ असे एकूण ४७ प्रभाग अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत.
या निवडणूकीकरीता एकूण सदस्य संख्या १४२ असून, त्यापैकी अनुसूचित जातीकरीता १० जागा व अनुसूचित जमातीकरीता ३ जागा आणि सर्वसाधारण १२९ जागा अशी वर्गवारी निश्चित करण्यात आलेली आहे. या १४२ जागांपैकी महिलांकरीता ५० % आरक्षणानुसार ७१ जागा महिलांकरीता राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून १० पैकी ५ जागा महिलांसाठी तसेच अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ३ जागांमधून २ जागा महिलांसाठी सोडत चिठ्ठीने आरक्षित करणार आल्या.
अशा एकूण ७ जागा राखीव गटातील महिलांसाठी सोडत चिठ्ठीने आरक्षित करण्यात आल्या. उर्वरित ६४ महिलांसाठी राखीव जागेकरीता मा. राज्य निवडणूक आयोगाने १ ते ४७ प्रभागातील अ व ब जागेमधील ४७ जागा नेमून दिलेल्या आहेत. सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करावयाच्या उर्वरित ३४ प्रभागाच्या ब जागेमधून सोडतीद्वारे १७ जागा सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १२ अ, २३ अ, १५ अ, २९ अ आणि ३ अ आरक्षित करण्यात आले आहेत. तर अनुसूचित जमाती ५ अ व २९ ब या दोन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तसेच १७ सर्वसाधारण महिला जागांसाठी प्रभाग १ ब, २ ब, १३ ब, १६ ब, १८ ब, २० ब, २१ ब, २५ ब, २६ ब, ३२ ब, ३६ ब, ३९ ब, ४१ ब, ४३ ब, ४५ ब, ४६ ब आणि ४७ ब प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
0 Comments