आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीकडे ढुंकूनही पहात नाहीत- सुप्रियाताई सुळे

 


ठाणे (प्रतिनिधी) -  “आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात; बाभळीच्या झाडाकडे लोक ढुंकूनही पहात नाहीत”, असे सूचक विधान करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत खा. सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत सूचक टोला लगावला.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त खा. सुप्रियाताई सुळे या ठाण्यात आल्या होत्या. या प्रसंगी त्यांनी बाळकूम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांच्या सोबत गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, मा. खा. आनंद परांजपे, मा. महापौर मनोहर साळवी, मा. विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, मिलींद पाटील, प्रमिला केणी, राष्ट्रवादीच्या शहर महिलाध्यक्ष सुजाताताई घाग,  कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की,  माझे सर्व आयुष्य हे यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानूनच जगत आलेली आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी दिवस, वार याची गरज मला भासत नाही. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनीच आणला. किंबहुना, त्यांच्यामुळेच महाराष्ट्राकडे प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून पाहिले जात आहे. 


नवीन तंत्रज्ञान आणि नवे विचार हे महाराष्ट्रातच येतात अन् त्यानंतर ते देशभर पोहचते. आज देशामध्ये स्टार्टअपची जी चर्चा सुरु आहे. त्याकडे पाहता, केंद्र सरकारचाच अहवाल सांगत आहे की, देशातील सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते केवळ आपल्या महाराष्ट्रातच आहेत. 


नबाब मलिक यांबाबत त्यांनी सांगितले की, मलिक  हे आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांच्या मुलींनी याबाबत माझ्याशी चर्चा केली आहे. आता त्यांच्यावर चांगले उपचार सुरु आहेत. 


चीनच्या भारतीय सीमेवरील कुरापतींबाबत त्या म्हणाल्या की, चीनचा विषय महत्वाचा आणि भारताने गांभीर्याने घेण्यासारखा आहे. आपण संसदेमध्ये अनेकवेळा युद्धविरोधी भूमिका घेतली आहे. कारण, युद्धामध्ये कोणीही जिंकत नाही. युद्धामध्ये केवळ महिला विधवा होतात आणि बालके अनाथ होतात.


युद्धाने प्रश्न सुटत नाहीत.  आम्ही मांडत असलेला हा विचार आता पंतप्रधान मोदी यांनीही स्वीकारला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानावेसे वाटतात. छप्पन इंच वगैरे या गोष्टी भाषणापुरत्या ठिक आहेत. पण, वास्तवात त्याचा काही उपयोग नसतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.


■सुप्रियाताई आणि ना. डॉ. आव्हाड शिवसेनेच्या शाखेत


बाळकूम येथे ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे; त्याच ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. सुप्रियाताई सुळे यांचे आगमन झाल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी  सुनील पाटील, वासुदेव भोईर  आणि संतोष भोईर यांनी सुप्रियाताई यांना चक्क शिवसेना शाखेत येण्याचे निमंत्रण दिले. सुप्रियाताई यांनीदेखील खुल्या दिलाने त्यांचे निमंत्रण स्वीकारले. शिवसेना शाखेत प्रवेश केल्यानंतर 

 

सुप्रियाताई यांनी छत्रपती शिवाजीमहाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,  माँसाहेब मीनाताई ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. या प्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सुप्रियाताई सुळे  आणि ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे स्वागत केले.  यावेळी स्थानिक शिवसेना  नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर हेदेखील उपस्थित होते. 


सुप्रियाताई शाखेतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी या संदर्भात विचारले असता, आम्ही तुम्हाला उद्याचे संपादकीय काय आहे, हे विचारतो का? आमचीही काही स्ट्रॅटेजी असेल.  पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय आम्ही त्यावेळीच जाहीर करू; त्यासाठी आताच चर्चा कशाला? असा सवाल करीत महाविकास आघाडीबाबत पहिले पाऊल टाकले.

Post a Comment

0 Comments