कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातील विविध गावांसाठी लवकरच निविदा जाहीर केल्या जाणार आहेत.
त्यामुळे दोन्ही तालुक्यांची अनेक वर्षांची पाणी प्रतीक्षा संपली असून या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ही गावे पाण्याच्या बाबतीत संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना राबवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. त्या ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी अशा योजना मंजूर करून घरोघरी पाणी देण्याचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न सुरू आहे.
इतकेच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या मलंगगड भागात पाणी पोहोचवण्यासाठी लाखो रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून घेतली आहे. या मोहिमेचा पुढचा भाग कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांकडे पाहिले जात होते. पाणी योजनांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित गावांची पाहणी करत त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही तयार केला होता.
ही प्रक्रिया वेगाने पार पाडल्यानंतर आता लवकरच जीवन मिशन अंतर्गत लवकरच कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध गावांच्या नळपाणी योजनेसाठी निविदा जाहीर केल्या जाणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
0 Comments