भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का?- ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा सवाल


ठाणे (प्रतिनिधी) - आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? असा सवाल करीत आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केल्या.  


स्वा. सावकर नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मयूर शिंदे यांच्या कार्यालयाचे ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी डॉ. आव्हाड बोलत होते. या प्रसंगी ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, हणमंत जगदाळे, अमीत सरैय्या, अन्नू आंग्रे, विक्रम खामकर आदी उपस्थित होते. ना. डॉ. आव्हाड म्हणाले की, सावकरकर नगर पट्ट्यात कार्यकर्त्यांचे नवीन जाळे विणले जात आहे. यामध्ये हणमंत जगदाळे हे स्वत: लक्ष घालत आहेत. त्यामुळेच मयूर शिंदेसारखी नवीन मुले चांगले काम करीत आहेत. मयूर शिंदे आणि अमीत सरैय्या यांना सांगणे आहे की, राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नसतात; तर, दैनंदिन जीवनात लोकांच्या अडचणी आपण कशा वेगाने सोडवू शकतो, त्यांना  होणारा त्रास आपण कसा कमी करु शकतो,  हेच म्हणजे राजकारण! मयूर शिंदे ज्या धडाडीने काम करीत आहे. 


ते काम  समाजोपयोगी आहे. पण, कार्यालय उघडून चालत नाही. त्यासाठी कार्यालयात पूर्णवेळ द्यावा लागतो.  आनंद परांजपे हे त्यासाठी उत्तम आदर्श आहेत. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्णवेळ कार्यालयात बसणे ही मोठी गोष्ट आहे. आनंद परांजपे हे लोकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पूर्णवेळ कार्यालयात असतात, ही आपल्यादृष्टीने जमेची बाजू आहे. त्यामुळेच अमीत सरैय्या आणि मयूर शिंदे यांना हेच आपले सांगणे आहे की कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या सोडवा. नेत्यांच्या आजूबाजूला फिरण्यापेक्षा कार्यालयात बसून नागरिकांना वेळ द्या. कार्यकर्ता हा मनाने बरोबर असावा; कार्यकर्ता आपल्या बसरोबर नसावा तर जनतेच्या सोबत असावा. भोंग्यांच्या प्रश्नावर ना. डॉ. आव्हाड म्हणाले की, आज भोंग्यांपेक्षा अनेक मोठ्या अडचणी या देशात आहेत. जातीय तेढ माजवून या देशातील बेरोजगारी जाणार आहे का? भोंगे लावून किंवा हटवून महागाई कमी होणार आहे का? पण, आपणाला मृगजळात अडकविण्यात आलेले आहे. एकवर्षापूर्वी कोविडमुळे अनेकजण रुग्णालयात होते. अनेकांची प्रेतांवर कोणी अंत्यसंस्कार केले, नातेवाईकांनाही कळले नाही. जे रुग्णालयात राहिले; त्यांची देखभाल कोणी केली? रुग्णांना प्लाझ्मा कोणी दिला? आपण रेमडेसीवर वाटताना जात-धर्म पाहिला नव्हता.


पण, आज एक वर्षानंतर कोविडमध्ये माणुसकी दाखविणारा समाज अचानक माणुसकी विसरतो आणि एकमेकांच्या जीवावर उठायला तयार होतो? कारण काय भोंगे? इतका भरकटणारा आपला समाज आहे का? आपणाला बुद्धी नाही काय? तेव्हा एकमेकांच्या मदतीला सर्वजण धावायचे. हाच जातीपातीच्या पलिकडचा महाराष्ट्र धर्म आहे. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश जेव्हा  आणला तेव्हा त्यांनी हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे, असे सांगितले होते. 


म्हणून महाराष्ट्र ज्या विचाराने पुढे गेलाय, तो विचार फक्त समोर ठेवा. कोण कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार करु नका. आपल्या दरवाजात एखादा माणूस मदतीसाठी आला तर महाराष्ट्र धर्म पाळून त्याला मदत करा, अशा सूचनाही ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

Post a Comment

0 Comments