कल्याण : शब्दात सौंदर्य असतं की, नृत्यासाठी शब्द लिहिले जातात कुणास ठावूक; पण लावणीचं रूप मनात भरल्या वाचून राहात नाही. थोडक्यात नृत्य, संगीत अन् अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे 'लावणी'. प्रत्येक लावणीची एक कहाणी किंवा प्रत्येक कहाणीला एक लावणी लागू करता येईल इतकी ती मार्मिक असते.
लावणीत शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. अशा या बहारदार लावणीवर ज्येष्ठ कथ्थक गुरू डॉ. मंजिरी देव यांनी ताल धरला. निमित्त होते, काशिनाथ घाणेकर सभाग्रुह येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्ताने 'मिरियार्ड आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस' या कार्यक्रमाचे.
यावेळी नृत्यगुरु डॉ.मंजिरी देव यांचा सन्मान आणि गुरुपुजन केले. या गुरुपूजनानंतर चक्क लावणीवर ताल धरला. ती लावणी होती चिन्मय मांडलेकर लिखित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या बॉक्स ऑफिसवर धुमाखुळ घालणाऱ्या सिनेमातील शीर्षक गीत. 'थांबलात का उंबऱ्याशी... या बसा राजी खुशी' या दीपाली विचारेने नृत्य दिग्दर्शन केलेलया गाण्यावर ज्येष्ठ कथ्थक गुरू डॉ. मंजिरी देव यांनी ताल, ठेका धरताच पदन्यास करताच संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
तर 'मिरियार्ड आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस' कार्यक्रमात लावणी सादर करणारा अश्मीक कामथे म्हणतो, " ज्येष्ठ कथ्थक गुरू डॉ. मंजिरी देव यांनी लावणी सादर केल्यामुळे मी भारावून गेलो आहे. लावणी हे खरेच शृंगारिक आहे: पण लावणी ही मुळातच व्हलगर नाही. कलाकारांच्या सादरीकरणातून लावणी ही सुबक दाखवण्याचा प्रयत्न होतो. आम्ही ती चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करतो. प्रेक्षकांनीही ती चांगल्या पद्दतीने घेतली पाहिजे. "
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्ताने 'मिरियार्ड आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस' मेघना जाधव, मेघा संपत, जय सिंग, सुकन्या कालन या मान्यवराच्या उपस्थितीत हा दिवस साजरा झाला. हा कार्यक्रम 'मिरियार्ड आर्ट' आणि 'मुद्रा आर्ट’ अकँडमीच्या संयुक्त विद्यमाने घेण्यातआला होता. या कार्यक्रमात मुंबई आणि ठाण्यातील १२ डान्स ग्रुप कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी, कुचिपुडी, इंडियन कंटेंप्ररी, लावणी, बॉलीलावणी, सेमी क्लासिकल आणि बालिवुड असे विविध १२ नृत्य प्रकार सादर केले.
0 Comments