कल्याण गायन समाजाच्या नवीन वास्तूची दशक पूर्ती संगीत संहिता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

कल्याण : गेली ९५ वर्षे संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कल्याण गायन समाजाच्या नवीन वास्तूचा दशकपूर्ती सोहळा रविवारी समाजाच्या सभागृहात पार पडला. यानिमित्ताने दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वार्धामध्ये नाट्यसुधा हा नाट्य संगीतावर आधारित कार्यक्रम सादर झाला. धवल भागवत व प्राजक्ता काकतकर या दोन उदयोन्मुख तरुण गायकांनी सादर केलेल्या नाट्यगीतांवर रसिक बेहद्द खूष होते. कार्यक्रमाला तबल्यावर स्वप्निल भाटे आणि ऑर्गनवर दिपक घारपुरे यांनी साथसंगत केली. राम जोशी यांनी गायन समाजाच्या नवीन वास्तूच्या निर्मितीमध्ये ज्यांचा मोलाचा हातभार लागला त्यांचे ऋणनिर्देश केले.

 


संगीत नाटकाची परंपरा पुढे चालू रहावी आणि नवनवीन संहिता रसिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने कल्याण गायन समाजाने संगीत नाट्यसंहिता लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत ३४ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण शुभदा दादरकरसंपदा जोगळेकर कुलकर्णी आणि श्रीयुत रवींद्र लाखे यांनी केले. उत्तरार्धात या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. श्रीयुत रवींद्र लाखे यांनी स्पर्धेचे परीक्षण कशाप्रकारे करण्यात आले ते समजावून सांगितले. प्रतिभेची जुनी शिल्पे जपत असताना नवीन शिल्पांची निर्मिती ही व्हायलाच हवीतरच कला प्रवाही राहील असे प्रतिपादन सौ संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी केले. समीर मोने (आरंभी स्मरितो पायी तुझे)राजीव जोशी (त्यागपर्व)अतुल पित्रे (चंद्रस्वराचे लेणे) यांना अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाची तर वादिराज लिमये (यक्षप्रश्न) आणि कौस्तुभ सरदेसाई (जिणे गंगौघाचे पाणी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सर्व स्पर्धक तसेच परीक्षक यांनी कल्याण गायन समाजाची प्रशंसा केली.


Post a Comment

0 Comments