जननी आशिषच्या यशोनंदन सभागृहाचे उदघाटन..

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डॉ. कीर्तीदा प्रधान यांच्या संकल्पनेतून १९९३ साली जननी आशिष या संस्थेची स्थापना झाली. आणि तब्बल २९ वर्षे ही संस्था यशोदामातेच्या भूमिकेतून अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे.याच पाश्वभूमीवर अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर जननी आशिषच्या ' यशोनंदन 'या नवीन सभागृहाचे उदघाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण व लक्ष्मी नारायण संस्थेचे अध्यक्ष माधव जोशी यांच्या हस्ते झाले. 


    सुरुवातीला जननी आशिषच्या छोट्या छोट्या बालकांनी हातात जननी आशिषचा नामफलक घेवून सर्वांचे स्वागत केले. आणि सबको मनकी शांती दो या गीतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर झालेल्या कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण विशेष अतिथी माधव जोशी ,संस्थेच्या संस्थापिका डॉ. कीर्तीदा प्रधान, संस्धेच्या अध्यक्ष जयश्री मोकाशी, सेक्रेटरी बीना धूत, कोषाध्यक्ष सुलभा धोंड्ये आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. संस्थेच्या अध्यक्ष मोकाशी यांनी सर्वांचे स्वागत केले.


        संस्थेच्या  यशोनंदन सभागृहाचे उदघाटन झाल्याचा आम्हाला आनंद होत आहे. सर्वाच्या सहकार्यामुळे हे सामाजिक कार्य चालू आहे असे मोकाशी यांनी सांगितले. संस्थेच्या संस्थापिका डॉ. प्रधान म्हणाल्या, २९ वर्षे जननी आशिष अनाथांच्या जीवनात आनंद फुलवत आहे. याचे मला समाधान वाटते.संस्थेच्या सेक्रेटरी धूत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना म्हणाल्या,  संस्थेमध्ये ६ वर्षे वयोगटातील ४३ बालके आहेत. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.


         गेल्या काही वर्षात मुलांचा सांभाळ करून कायदेशीर नियमानुसार त्यांना चांगल्या कुटुंबात दत्तक दिले आहे असेही त्या म्हणाल्या.   कोषाध्यक्ष  धोंड्ये यांनी संस्थेच्या आर्थिक नियोजनाची माहिती देवून संस्थेला आर्थिक सहकार्य करणा-या सर्वांचा कृतज्ञता पूर्वक उल्लेख केला.यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांनी जननी आशिषच्या महत्वपूर्ण सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. तर विशेष अतिथी  जोशी म्हणाले,  जननी आशिषचे कार्य मोलाचे आहे. त्यांच्या या कार्याची दखल सर्वानी घ्यायला हवी.
   

           यानंतर प्रमुख पाहुणे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, जननी आशिषच्या यशोनंदन सभागृहाचे आज उदघाटन झाले आहे. सभागृहात मुलांना खेळण्यासाठी. करमणुकीच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. या अतिशय महत्वाच्या सामाजिक कार्यास सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. हा समाजकार्याचा वसा जननी आशिषने घेवून अनेक कुटुंबात आनंद निर्माण केला आहे. याची दखल समाजाने जरूर घ्यावी..।
   

          या कार्यक्रमास अनेक डॉक्टर. देणगीदार व मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा पाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिषा मोकाशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments