मनसे पक्षाने कधीही माझी दखलच घेतली नाही... संजीव ताम्हाणे

   


डोंबिवली ( शंकर जाधव ) शुक्रवारी मुंबईत डोंबिवलीतील काही मनसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.या मनसैनिकांनी मनसेला का सोडचिठ्ठी दिली ? शिवसेनेतच का प्रवेश केला ? कोणावर नाराजी होती का ? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले होते. मनसेला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केलेल्या संजीव ताम्हाणे यांनी  माझा मनसेत कोणावरही नाराजी नसली तरी आजवर मनसे पक्षाने कधीहि  माझी दखलच घेतली नाही अशी खंत व्यक्त केली.

   

मनसैनिक संजीव ताम्हाणे म्हणाले, मला यापूर्वीच शिवसेनेकडून बोलावणे आले होते. मात्र त्यावेळी मी ठाम निर्णयावर नव्हतो. आता मी निर्णय घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.माझी मनसेतील कोणत्याही पदाधिकारी , कार्यकर्त्यावर नाराजी नाही.मनसेत असताना कोरोना काळात नागरिकांना मदत केली.नागरिकांचे लसीकरण करताना मदतही केली.ही व अशी अनेक सामाजिक कामे केली. परंतु कधीही मनसेने माझी साधी दखल देखील घेतली नाही.

    

शिवसेनेतच प्रवेश का केला ? या प्रश्नावर उत्तर देताना ताम्हाणे म्हणाले, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची विकास कामे पहिली. सामान्य जनतेसाठी नेहमी झटणारे खासदार डॉ. शिंदे यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.शिवसेनेत काम करण्याची खूपच संधी आहे.जनतेच्या समस्या, अडीअडचणी दुर करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न करीन.


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मला ग्वाही दिली आहे कि शिवसेनेत मला मान-सन्मान मिळेल.मनसे पक्ष जरी सोडला असला तरी माझ्या हृदयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहे व कायम राहणारच.माझ्या कार्यालयात राज ठाकरे यांचा फोटो कायम राहील.

Post a Comment

0 Comments