जिल्हास्तरा वरील कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यां कडून आढावा

विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी ३१ मेस पंतप्रधान संवाद साधणार


ठाणे, दि. २७ (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी दि. ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. जिल्हास्तरावर या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे उपस्थित होते.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा जिल्हा सूचना  विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, तहसीलदार राजाराम तवटे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गीता काकडे आदी यावेळी उपस्थित होते.


जिल्हास्तरावर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बोलवण्यात आले असून पालकमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आदी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यावेळी विविध योजनांविषयी ध्वनीचित्रफित दाखविण्यात येणार आहे. स्थानिक कार्यक्रमानंतर सुमारे ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीयस्तरावरील कार्यक्रमास सुरूवात होईल. यावेळी पंतप्रधान निवडक जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधतील.


ठाणे येथील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम होणार असून त्याच्या पूर्वतयारीचा आढावा याबैठकीत घेण्यात आला. यावेळी उपस्थित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दांगडे यांनी सूचना दिल्या.

Post a Comment

0 Comments