केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला संवाद ठाणे येथेही जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन


ठाणे, दि.३१ (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत विविध केंद्रीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून येथील नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.


दरम्यान, गरिब कल्याण संमेलन अंतर्गत सिमला येथे पंतप्रधानांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी देशभरातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. देशातील नागरिकांचा सन्मान, सुरक्षा, समृद्धी, कल्याणासाठी संकल्प करीत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. गेल्या आठ वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांना कशा प्रकारे लाभ मिळाला आहे याबाबत त्यांनी माहिती दिली. 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत राज्याच्या ग्रामविकास विभागाने राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. 


योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते.  हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थ्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


केवळ योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असे चित्र महाराष्ट्रात नसून शेवटच्या घटकांपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थ्याशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला तसेच त्यांच्या आणखी काही अपेक्षा आहेत का ते जाणून घेतले. ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील मनोगत व्यक्त केले.


ठाणे जिल्हा नियोजन भवनच्या समिती सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमास आमदार रमेश पाटील, गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती वंदना भांडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, तहसीलदार राजाराम तवटे आदि मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी जिल्हास्तरीय कार्यक्रमात दीक्षा खांबळे, निवृत्ती मगर, श्रावण निर्गुडा, रमेश मार्तंड, संजितकुमार, सुशीलाबाई, आदर्श साबळे, धनश्री माने, सीताबाई मुकणे, शिल्पा पाटील,चंद्रकांत गायकर या लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. उप मुख्यकार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments