नृत्यस्वरूप गीत रामायणाने कल्याणकर रसिक झाले मंत्रमुग्ध


कल्याण : चैत्र महिना आणि जागतिक नृत्यदिनाचं औचित्य साधतकल्याणच्या होरायझन इव्हेंट्स आणि ठाण्याच्या शरयू नृत्यमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने  नृत्यस्वरूप गीतरामायणाचे आयोजन कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. नृत्य व गायनाचा अनोखा मिलाफ पाहायला रसिकांनी गर्दी केली होती. नृत्यस्वरूप गीतरामायणाने कल्याणकर रसिक मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले.


लोकप्रिय नर्तिका सोनिया परचुरे यांच्या दिग्दर्शनाखाली शरयू नृत्यमंदिराच्या ४० नर्तकनर्तिकांनी या नृत्याविष्कारात भाग घेतला होता. कुश लव रामायण गाती या गीतापासून सुरवात होऊन देव हो बघा रामलीला या गीतापर्यंतचा प्रवास सलग सव्वा दोन तास चालला. एकूण ३४ गाण्यांवरती या चमूने विविध नृत्यरचना सादर केल्या. अवीट गोडीची गीतरामायणातील गीते आणि त्या शब्दसुरांना अक्षरशः जिवंत करणारी नृत्ये या अनोख्या संगमाने रसिक अक्षरशः भारावून गेले होते.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राजक्ता आपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या विषयाला अतिशय अनुरूप असे नेपथ्य राम जोशी यांचे होते.

Post a Comment

0 Comments