केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतले आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शुभाशीर्वाद

■केंद्र सरकारच्या योजनांमध्ये दासभक्तांच्या सहभागा बाबत चर्चा

भिवंडी, दि. 5 (प्रतिनिधी) : ज्येष्ठ निरूपणकार, पद्यश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी रेवदंडा येथे सदिच्छा भेट घेतली. या वेळी श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून राज्यमंत्री कपिल पाटील यांना शुभाशीर्वाद देण्यात आले. दरम्यान, केंद्र सरकारच्या योजना ग्रामस्थांपर्यंत पोचविण्याबरोबरच गावांच्या शाश्वत विकासासाठी दासभक्तांचा सहभाग घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली, असे श्री. पाटील यांनी सांगितले.


केंद्र सरकारकडून साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल महिन्यात पंचायत राज  मंत्रालयामार्फत नवी दिल्ली येथे आयकॉनिक वीक कार्यक्रम साजरा झाला. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मा. तिर्थरुप डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या दासभक्तांकडून राबविल्या जाणाऱ्या यशस्वी व भव्य स्वच्छता मोहिमेचा उल्लेख केला होता. 


या परिषदेच्या माध्यमातून डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींच्या समाजाप्रती असलेल्या अतुल्य योगदानाची देशभराला ओळख करून दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेवदंडा येथे आज आवर्जून मा. आप्पासाहेबांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी मा. आप्पासाहेबांनी श्री. कपिल पाटील यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व शाल देत शुभाशीर्वाद दिले. या वेळी सचिनदादा धर्माधिकारी व राहुलदादा धर्माधिकारी यांचीही उपस्थिती होती.


केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना सुरू आहेत. या योजनांमधून अनेक कुटुंबांबरोबरच गावांचा शाश्वत विकास होऊ शकतो. त्यासाठी दासभक्तांच्या सहभागाची सुचना राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. या योजनांच्या अंमलबजावणी व गावांच्या विकासात दासभक्तांचे योगदान मिळाल्यास गावांचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास श्री. कपिल पाटील यांनी व्यक्त केला.


या वेळी आमदार महेश चौघुले, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार नरेंद्र पवार, भिवंडी महापालिकेतील सभागृह नेते व नगरसेवक सुमित पाटील, भाजपाचे भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते आदींचीही उपस्थिती होती.


जेएसडब्ल्यू प्रकल्पग्रस्तांबाबत चर्चा
दरम्यान, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेवदंड्याच्या दौऱ्यात मुरुड तालुक्यातील मिठेखार, चेहेर, निडी, साळाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या विषयांवर जेएसडब्ल्यू प्रशासनाशी चर्चा केली. या चर्चेमध्ये १९८९ आणि २००९-१० मधील भुसंपादित प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेण्याबरोबरच भरीव नुकसानभरपाई मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 


या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, कंपनी प्रशासनातील अधिकारी, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments