शासनाने दोन वर्षात केलेल्या भरीव कामांची माहितीविकास प्रदर्शनातून दिसते प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया


ठाणे, दि. 2 (जिमाका) : विकास प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात भरीव कार्य केले आहे. हे येथे आल्यावर समजते. विविध योजनांची विस्तृत माहिती तर आहेच. परंतू त्याचे प्रत्यक्ष फोटो देखील पहायला मिळतात. अशी प्रतिक्रिया स्वानंद वैद्य यांनी व्यक्त केलेली ही प्रातिनीधीक प्रतिक्रीया आहे. 


           कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून “दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची” या मोहिमेंतर्गत सचित्र प्रदर्शनाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. नूतनीकरण झालेल्या ठाण्यातील ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये ते सध्या सुरू आहे. यावेळी सकाळच्या सुमारास सहकुटुंब आलेल्या श्री. वैद्य यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर ही प्रतिक्रीया व्यक्त केली. ही प्रतिक्रिया म्हणजे शासनाने केलेल्या चांगल्या कामाची प्रातिनिधीक प्रतिक्रिया आहे.


           काल या प्रदर्शनाचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असून त्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती मिळत असल्याचे ते सांगत आहेत. भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या विकास कामांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांची माहिती देणारे स्वतंत्र पॅनलही याठिकाणी लावण्यात आले आहे. 


           प्रदर्शन पाहत असताना शिवभोजन योजनेबाबत माहिती देणाऱ्या पॅनल जवळ मुलुंडचे विशाल कुलकर्णी थांबले आणि म्हणाले, घाटकोपरला मी स्वत: शिवभोजनाचा आस्वाद घेतला आहे. अतिशय चांगली योजना असून राज्य शासनाने विविध लोकोपयोगी निर्णय घेऊन शेतकरी, सामान्य नागरिकांना दिलासा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे नागरिक या माहिती फलकांसोबत आपला सेल्फी घेत असल्याचे चित्रही दिसत आहे. 


            याठिकाणी ठेवण्यात आलेल्या अभिप्राय नोंदवहितही नागरिक आपल्या प्रतिक्रिया नोंदवित आहेत.  हे प्रदर्शन 5 मे पर्यंत सर्वांसाठी खुले असून विनामुल्य पाहता येईल. ठाणेकर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments