ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.
या कारवाईतंर्गत माजिवडा- मानपाडा प्रभाग समिती येथील महेश म्हेत्रे यांनी ब्रम्हांड फेज -८ मागील महापालिकेच्या नाल्यालगत केलेल्या दोन पक्क्या खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तसेच १२०० चौ. फुट पत्रा शेडचे बांधकाम जेसीबी मशिनच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले.
कासारवडवली पुरुषोत्तम प्लाझा या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील २०० चौ. फुट अनिवासी पत्र्याचे बांधकाम जेसीबी मशिनच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आले. कावेसर वाघबिळ रस्तारंदीकरणात अडसर ठरणाऱ्या सहा पक्क्या खोल्यांचे बांधकाम तसेच बाळकुम येथील दादलानी रोड अशोकनगरच्या मागील पत्राशेडचे अंदाजे ४०० चौ. फुटाचे अतिक्रमण मनुष्यबळाने हटविण्यात आले.
तसेच बाळकुम नाका भिवंडी रोड डावी बाजु येथील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अनधिकृत फेरीवाले हटवून १८ हातगाडया व अन्य सामान जप्त करण्यात आले तसेच बाळकुम बस स्टॉप वरील १० x १० चौ. फुट झोपडीचे अतिक्रमण मनुष्यबळाने हटविण्यात आले.
सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे, उप आयुक्त(परिमंडळ- ३) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
0 Comments