कल्याण : "माय सिटी फिट सिटी" या संकल्पनेअंतर्गत महापालिकेच्या नागरिकांचा फिजीकल फिटनेस चांगला रहावा यादृष्टीकोनातून जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या अधिका-यांसमवेत केंद्र शासनाच्या "फ्रिडम 2 वॉक" या स्पर्धेत स्वत: देखील सहभागी होऊन महापालिकेस प्रथम पुरस्काराचा मान मिळवून दिला.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातही माय सिटी, फिट सिटी हे उद्दीष्टय डोळयासमोर ठेवून महापालिका क्षेत्रातील खेळाडूंसाठी भरीव तरतूद केली आणि शहरातील प्रदुषण कमी व्हावे, वाहतूक कोंडी कमी व्हावी या दृष्टीकोनातून आयुक्तांनी कल्याण डोंबिवली नगरीत सायकल संस्कृती वाढविण्यासाठी पुढाकार घेतला असून आता कल्याण व डोंबिवलीतील प्रत्येकी एक रस्ता सकाळी ५ ते ८ या वेळेत सायकलिंग आणि चालण्यासाठी उपलब्ध राहणार असून या वेळेत सदर रस्त्यांवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
यामध्ये पत्रीपूल ते ठाकुर्ली (90 फुटी रस्ता) हा सुमारे २ कि.मी. रेल्वे समांतर रस्त्यावर पदपथाच्या बाजूची मार्गिका चालण्यासाठी आणि दुभाजकाच्या बाजूची मार्गिका सायकलिंगसाठी उपलब्ध राहिल. त्याचप्रमाणे कल्याण रिंग रोडवर गांधारे ब्रीज ते बारावे घनकचरा प्रकल्पापर्यंत- नदीच्या बाजूने चालण्यासाठी व विरुध्द बाजू सायकलिंगसाठी उपलब्ध राहिल.
येत्या शनिवारपासून कल्याण डोंबिवलीतील एक मार्गिका दररोज सायकलिंग आणि चालण्यासाठी सकाळी ५ ते ८ या वेळेत नागरिकांसाठी खुल्या करण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि सहभागी होवून माय सिटी फिट सिटी या संकल्पनेस प्रतिसाद दयावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
0 Comments