'माझी काँर्पोरेट दिंडी' पुस्तकाचा डोंबिवलीत दिमाखदार प्रकाशन सोहळा


डोंबिवली ( शंकर जाधव ) व्यावसायिक जगतात उच्च स्थानी पोचल्यावर डोंबिवली शहरातील वास्तव्य इतरत्र न हलवल्याबद्दल डोंबिवलीकरांनी जणू आज माधव जोशी सरांचे औक्षण केले आहे' असे  उदय निरगुडकर यांनी काढले. ग्रंथाली प्रकाशित आणि  माधव जोशी लिखित "माझी कॉर्पोरेट दिंडी" या आत्मकथनपर पुस्तकाच्या जाहीर प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.टिळकनगर विद्यामंदिराच्या पटांगणावर हा सोहळा पार पडला.
  

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  एक्स्प्रेस समुहाचे व्यवस्थापकीय संचालक  जॉर्ज वर्गीस उपस्थित होते. त्यांनी  माधव जोशी यांच्यातील आत्मविश्वास, नम्रता, कामांसाठी पुढाकार घेण्याची तयारी आणि संघवृत्ती (टीम प्लेअर) या पुस्तकातून आणि प्रत्यक्ष सान्निध्यातून प्रत्ययाला येणाऱ्या गुणांचा उल्लेख केला.


डोंबिवलीतील नामवंत अर्थतज्ज्ञ, लेखक श्री चंद्रशेखर टिळक, पत्रकार सुधीर जोगळेकर, डोंबिवलीतील शिक्षण क्षेत्रात कार्यरत  श्रीकांत पावगी यांनीही मनोगते व्यक्त करत  माधव जोशी यांच्या पुढील लेखन वाटचालीसाठी अपेक्षा व्यक्त केल्या. ग्रंथाली विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर ,प्रभाकर भिडे,चित्रकार सतीश भावसार आणि इतर सदस्य उपस्थित होते.
     

स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.  या कार्यक्रमात कॉर्पोरेट आणि सामाजिक क्षेत्रातील सुमारे तीन पिढ्या उत्साहाने सहभागी झालेल्या होत्या. दिपाली काळे आणि सुनिला पोतदार यांच्या संस्थेतील चाळीस बाल आणि तरुण कलाकारांनी पुस्तकाच्या नांवाला साजेशा दिंडीतून पुस्तक मंचावर प्रकाशनासाठी आणले. 


माधव जोशी यांनी आपल्या मनोगतात आपल्या वाटचालीत मार्गदर्शन करणाऱ्या प्रत्येकाचा आणि पुस्तकाच्या निर्मितीत सहभागी झालेल्या सर्वांचा उल्लेख केला.संकेत ओक आणि वृशांक कवठेकर यांनी अभिवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ सोहोनी तर प्रवीण दुधे यांनी आभारप्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments