वृद्धाचा मोबाईल लांबविणारा सराईत चोरटा अटकेत 2 मोबाईल हस्तगत अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची चिन्हे


डोंबिवली ( प्रतिनिधी )  पश्चिम डोंबिवलीतल्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात विष्णूनगर पोलिसांनी वृद्धाचा मोबाईल लांबविणाऱ्या या सराईत चोराला अटक करण्यात यश मिळविले. त्याच्याकडून लांबविलेले 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तर त्याच्याकडून अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


      चंदन विनोद बिरगोडे (24) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून हा चोरटा पश्चिम डोंबिवलीतल्या जुनी डोंबिवलीतील आर. के. पॅलेसमध्ये राहणारा आहे. त्याला रविवारी कल्याणला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील जमादार सुभाष नलावडे, शशिकांत नाईकरे, हवा. कैलास घोलप आणि पोशि कुंदन भामरे हे पथक डोंबिवली रेल्वे स्टेशन
परिसरात पेट्रोलिंग करत होते. इतक्यात एकजण संशयास्पदरित्या भरधाव वेगात धावताना आढळून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला काही अंतरावर पकडले. चौकशीदरम्यान त्याने एका पादचारी वुद्धाकडील मोबाईल खेचून पळ काढल्याची कबूली दिली. 
     

नाना शंकर शेठ रोडला सहवास बिल्डींग, आवरओन सोसायटीत राहणारे मोहन रामचंद्र सुतावणे (78) हे शनिवारी सकाळच्या सुमारास रस्त्याने शतपावली करत होते. इतक्यात अचानक आलेल्या तरूणाने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळ काढला. मोहन सुतावणे यांनी आरडाओरडा केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या वृद्धाच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 


तक्रारीची नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तशा सूचना दिल्या. या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या काही तासांतच वृद्ध सुतावणे यांचा मोबाईल लांबविणाऱ्या चंदन बिरगोडे याला अटक केली. चोरट्याला पाठलाग करत पकडणाऱ्या या पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे. 


त्याच्याकडून आतापर्यंत 2 मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याच्याकडून अशाप्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनी व्यक्त केली. या प्रकरणी अधिक तपास जमादार सुभाष नलावडे करत आहेत.

Post a Comment

0 Comments