कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास तात्काळ कारवाई करा: अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी कांदळवन समितीची पहिली आढावा बैठक आज संपन्न

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असून कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश कांदळवन समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी यांनी दिले.


       ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कांदळवनाच्या तक्रारीचा निपटारा जलद गतीने होण्याकरिता जिल्हाधिकारी, ठाणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांच्या अध्येक्षतेखाली कांदळवन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक आज महापालिका भवन येथे पार पडली.


       यावेळी शहरात कांदळवनाचे तसेच पाणथळ क्षेत्र आहे. पर्यावरण व जैवविविधतेच्या दृष्टीने कांदळवन महत्त्वाचे असून या कांदळवनांचे जतन होण्यासाठी या परिसरात कोणताही भराव, अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी यांनी दिले.


        ठाणे शहरातील कांदळवनावरील अतिक्रमणामुळे पर्यावरणचा ऱ्हास होत असल्याची भीती पर्यावरणप्रेमीनी व्यक्त करत काही तक्रारी दाखल केल्या असून महापालिका क्षेत्रात असा कोणताही प्रकार घडल्यास त्याप्रकरणी तात्काळ दखल घ्यावी व पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेशही अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.


       या आढावा बैठकीस कांदळवन समितीचे सदस्य उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, विधी सल्लागार मकरंद काळे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, कार्यकारी अभियंता रामदास शिंदे तसेच प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments