कळवा येथील स्मशानभूमी व तरण तलावाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश


ठाणे  :  ठाणे शहरातील विविध प्रभागसमितीमध्ये असलेल्या स्मशानभूमींचा पाहणीदौरा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सुरू ठेवला आहे. आज कळवा येथील मनिषानगर मधील स्मशानभूमीची व कै.यशवंत राम साळवी तरणतलावाची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन या ठिकाणी आवश्यक असलेली सर्व कामे तातडीने करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


या पाहणी दौऱ्यास आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या समवेत राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, माजी नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, मनाली पाटील, उप आयुक्त मारुती खोडके, मनीष जोशी, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे,  कार्यकारी अभियंता मनोज तायडे, मोहन कलाल, विकास ढोले व इतर अधिकारी उपस्थित होते.


 कळवा येथील मनिषा नगरमधील स्मशानभूमी खूप जुनी स्मशानभूमी आहे, तसेच मध्यवर्ती ठिकाणी ही स्मशानभूमी असल्यामुळे येथे मोठ्याप्रमाणावर अत्यंविधी होत असतात. या ठिकाणी डिझेल शववाहिनी असून येथे महानगर गॅसची पीएनजी शवदाहिनी उपलब्ध करणेसाठी संबंधित विभागाशी पाठपुरावा करावा, विद्युत शवदाहिनीमधून निघणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना होवू नये यासाठीही उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 


सद्यस्थितीत मनिषानगर स्मशानभूमीचे काम सुरू आहे, या ठिकाणी नवीन चुल्हे बसविण्याचे काम सुरू आहे, परंतु सदरचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे आठ महिन्याचा कालावधी लागणार आहे, या दरम्यान गैरसोय होवू नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शेड टाकून चुल्हे बसविण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. अत्यंविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची सोय, शव ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करावी तसेच पिण्याचे पाणी व इतर रंगरंगोटीची कामे देखील तातडीने करण्याबाबतच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.


दरम्यान आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मनिषानगर येथील कै. यशवंत रामा साळवी तरणतलावाची देखील पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी महापालिकेच्या कै. यशवंत रामा साळवी तरणतलावाची पाहणी केली. तरणतलाव सुरु करताना या ठिकाणी आवश्यक असलेली किरकोळ कामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच जलतरणपटूंसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था बाहेरच्या बाजूला करावी, स्वच्छतागृहामध्ये पाणी तसेच स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. 


त्याचप्रमाणे पाणी शुध्दीकरण प्लान्टची जेथे गळती होत आहे त्याठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. 

Post a Comment

0 Comments