ऑटो रिक्षातून वीज ग्राहक सुविधांचा जागर दोन हजार रिक्षांमध्ये बसवले ग्राहक सुविधांच्या माहितीचे फलक


डोंबिवली ( शंकर जाधव) आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून महावितरणने वीज ग्राहकांना जवळपास सर्वच सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. हाताच्या बोटावर उपलब्ध असलेल्या या सुविधांच्या माध्यमातून ग्राहक आपल्या वेळ व पैशांचीही बचत करू शकतात. कल्याणमधील सुमारे दोन हजार रिक्षांमध्ये चालक व प्रवाशांमधील सेपरेटरवर या सुविधांची माहिती असलेले फलक लावण्यात येत आहेत. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या हस्ते  या कामाचा शुभारंभ करण्यात आला.


पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या ‘गो ग्रीन’ सुविधेत सहभागी ग्राहकांना छापील प्रत देण्याऐवजी ई-मेल तसेच ‘एसएमएस’द्वारे वीजबिल देण्यात येते. यातून कागदाच्या बचतीसह ग्राहकांना प्रतिबिल दहा रुपयांची सवलत मिळते. तसेच डिजिटल माध्यमातून वीजबिलाचा भरणा, नवीन जोडणीसह विविध सुविधा, तक्रार दाखल करणे व तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे आदी उपलब्ध असलेले सुरक्षित व सुलभ पर्याय ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी रिक्षांची मदत घेण्यात येत आहे. 


यातून रिक्षाचालकांनाही सेपरेटरची सुविधा मोफत उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे रिक्षातून प्रवास करणारे वीज ग्राहक महावितरणशी डिजिटल माध्यमातून जोडले जातील, असा विश्वास मुख्य अभियंता औंढेकर यांनी व्यक्त केला. तर या उपक्रमासाठी रिक्षाचालकांची मदत घेतल्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष पेणकर यांनी महावितरणचे आभार मानले.


यावेळी रिक्षा महासंघाचे पदाधिकारी जितेंद्र पवार, संतोष नवले, राजू नायर यांच्यासह महावितरणचे सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, कार्यकारी अभियंता प्रताप मचिये, दीगंबर राठोड, प्रवीण चकोले, राजीव रामटेके, सुभाष बनसोड यांच्यासह अधिकारी, अभियंते, कर्मचारी, रिक्षाचालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments