केडीएमसीच्या बारावे घनकचरा प्रकल्पात भीषण आग


कल्याण  : कल्याणात कचऱ्याला आग लागण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. कल्याण डंपिंग ग्राउंडला आग लागून काही दिवसही उलटत नाहीत तोच आता कल्याणातील बारावेच्या घनकचरा प्रकल्प केंद्रालाही मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये बारावे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्यासह या केंद्राचेही मोठे नुकसान झाले आहे. 


      कल्याण पश्चिमेच्या बारावे परिसरात रिंगरोडला आणि गांधारी नदीला लागून असणाऱ्या या कचरा प्रकल्पात हा प्रकार घडला. काल मध्यरात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या बारावेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकलपात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जाते. गेल्या काही महिन्यांपासून हे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे. मात्र शुक्रवारी याठिकाणी लागलेल्या आगीमध्ये या कचरा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. 


पहाटे लागलेली ही आग बराच वेळ धुमसत होती. अग्निशमन दल त्यावर नियंत्रण मिळवण्या साठी शर्थीचे प्रयत्न करत होते. तसेच ही आग सध्या नियंत्रणात आल्याची माहितीही मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागून काही दिवसही उलटले नाहीत. तोच या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली की कोणी लावली याबाबत आत्ता काही सांगणे अवघड असले तरी अवघ्या काही दिवसांच्या फरकाने पुन्हा घडलेल्या या आगीच्या प्रकारामुळे संशयाचा धूर मात्र नक्कीच निघत आहे.


      दरम्यान बारावे प्रकल्पाच्या शेडच्या बाहेर ठेवलेल्या कचऱ्याने तीव्र तापमानामुळे आग लागल्याची शक्यता असून  महानगरपालिकेने नियमाप्रमाणे कचरा फक्त शेडच्या आत ठेवावा व तो वेगवेगळा करून तेथून लवकरात लवकर हलवावा अशी मागणी बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील घेगडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments