महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली- ना. डॉ. जितेंद्र आव्हाड

 


ठाणेे  (प्रतिनिधी)  -  शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करणार्‍यांची माथी कोण भडकावत आहेत, हा मुद्दा आपल्यादृष्टीने गौण आहे. पण, जे काही घडलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, अशी टीका गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचार्‍यांनी हल्ला केला. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत असतानाच गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधून या कृत्याचा निषेध केला. 


ना. डॉ. आव्हाड म्हणाले की,  काल कोर्टामध्ये एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा निकाल लागला. कोर्टाच्या बाहेर पेढे वाटण्यात आले. कोर्टाच्या बाहेर एसटी कर्मचार्‍यांनी न्यायदेवतेचा जयजयकार केला अन् आमचा विजय झाला, असे सांगितले आणि आज जे काही घडलं; ते का घडलं, कसं घडलं, यावर मला बोलायचे नाही. पण, ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या व्यक्तीगत घरावर म्हणजे जे घर सरकारी नाही; ज्या घरात त्यांची वयोवृद्ध पत्नी राहते, मुलगी राहते, नात-नातू राहतो; त्या घरात अचानक घुसणे, हा लोकशाहीचा पहिला खून आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये आजपर्यंत असे कधीही घडलेले नाही. मला आठवते की, 1993 साली गोपिनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. 


त्यावेळी या शाब्दीक हल्ल्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, हे ओळखून शरद पवार यांनी रात्री दोन वाजता पोलिसांची बैठक घेतली आणि गोपिनाथ मुंडे यांची सुरक्षा दुप्पट केली. हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘स्पर्श’ आहे. शरद पवार हे मोठ्या मनाचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यावेळी सोनेरी झालर होती. राजकीय टीका केल्यानंतरही व्यक्तीगत आयुष्याचा सन्मान करायची संस्कृती या महाराष्ट्राची आहे. प्र. के. अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावरील टीका आणि यशवंतराव चव्हाणांनी अत्रे यांना घरी बोलवून वस्तूस्थिती समजावून सांगणे; त्यानंतर अत्रेंनी यशवंतरावांवर कधीही टीका न करणं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आता मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलून त्याची ‘दशा’ होतेय. ज्या महाराष्ट्राने संस्कारक्षम राजकारण बघितले आहे. त्याच महाराष्ट्रात असे होणार असेल तर या पुढील राजकारण काय असेल, हे सांगणे अवघड आहे. 

 

या हल्ल्यामागे राजकीय शक्ती आहे का, असे विचारले असता, “ या मागे कोणती राजकीय शक्ती आहे किंवा नाही, हा प्रश्न नाही. पण, हे ज्याने कोणी घडवून आणले असेल. त्याला काय वाटते तो सुरक्षित आहे? “तलवारीच्या ताकदीवर जगणारे तलवारीनेच मरतात,” ही एक म्हण आहे. असे कोणाच्या घरावर हल्ले करुन लोकांची मने नाही जिंकू शकत. उलट लोकांना किळस वाटू लागली आहे.  घरात घुसणार्‍या या एसटी कर्मचार्‍यांना सुप्रियाताई सामोर्‍या गेल्याच ना? त्यांच्यामध्ये शरद पवार साहेबांचे रक्त आहे त्याच सुप्रियाताईंनाही धक्काबुक्की करता, ही लोकशाही नाही. हे राजकारणच मुळी चुकीचे आहे. या प्रकाराचा मी तर धिक्कार करतोच; पण, महाराष्ट्राच्या मातीवरचा प्रत्येक माणूस याचा धिक्कार करेल, असेही ना. डॉ. आव्हाड म्हणाले.  


एसटी कर्मचार्‍यांची माथी कोणी भडकावली आहेत का, या प्रश्नावर डॉ. आव्हाड यांनी,  कोण माथी भडकवतोय, त्यांच्या डोक्यात कोण तापलेले तेल ओततोय, हा मुद्दा माझ्या दृष्टीने गौण आहे. पण, जे काही घडतंय ते महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारे आहे, असे सांगितले. या हल्ल्याला उत्तर देणार का, यावर बोलताना, हा प्रकार  काय आहे, कसला आहे? महाराष्ट्राच्या जनतेला समजतेय. एकीकडे जयजयकार करता आणि दुसरीकडे पवारसाहेबांच्या घरावर हल्ला करता; पण, असेही समजू नका की आम्ही बांगड्या घातल्यात; पण, आम्ही लोकशाहीचा सन्मान करतो. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे. पण, आम्ही लोकशाहीचा सन्मान करणारे असल्याने आम्ही वेडेवाकडे कृत्य करणार नाही.


 पण, जर तुम्ही आमच्या नेत्याच्या घरापर्यंत जाणार असाल तर त्याचा आम्ही निषेध तर करुच ना? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने या गोष्टीचा मनातल्या मनात तरी निषेध करायला हवाय.  आम्ही उत्तर द्यायला आलेलो नाही. आम्ही लोकशाही मानणारे आहोत. आम्ही शांततेचा मार्ग अनुसरणार; फक्त एसटी कर्मचार्‍यांना आपण सांगू इच्छितो की,  ज्या एसटी कर्मचार्‍यांनी हे सर्व केले. त्यांनी इतिहास तपासावा; पाच-पाच संघटना असणार्‍या एसटी कर्मचार्‍यांचे अघोषित नेते गेली पाच दशके शरद पवार हेच आहेत. 


ज्यांना या संघटनांची माहिती आहे त्यांना विचारुन बघा त्यांचे नेते कोण आहेत? आता जे काही जन्माला आले आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे नाही. महाराष्ट्राला वेठीस धरणे, कोर्टाच्या निकालानंतर जयजयकार करुन पवारसाहेबांच्या घरात घुसणे हे काही योग्य नाही, असेही ना. डॉ. आव्हाड म्हणाले.

Post a Comment

0 Comments