कल्याण पूर्वेतील तिसाई देवीच्या यात्रेला सुरवात दोन वर्षांच्या खंडानंतर भक्तगणात उत्साह द्विगुणीत


कल्याण :  सुमारे ४०० वर्षांची परंपरा असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात आगरी - कोळी समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या तिसगांवातील तिसाई देवीच्या यात्रेला आज पासुन सुरवात झाली असून ही यात्रा सलग दोन दिवस चालणार आहे . प्रती वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सुरु होणाऱ्या तिसाई देवीच्या यात्रेत गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे खंड पडला होता. परंतु या वर्षी हे संकट दुर झाल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भक्तगणांत आनंद द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसुन येत आहे .


आज सकाळी जरीमरी सेवा मंडळाचे संचालक भगवान भोईर यांच्या हस्ते देवीचा अभिषेक व विधीवत पूजा अर्चा केल्यानंतर देवीसह मंदीराचा मुख्य गाभारा फुलांनी आकर्षक अशा पद्धतीने सजविण्यात आला. त्यानंतर तिसाई भक्तांना देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदीर खुले करण्यात आले.
सायंकाळच्या महाआरती  तिसाई देवीच्या प्रतिमेची सजवलेल्या पालखीतून तिसगांवात भव्य शोभा यात्रा काढण्यात येत आहे . या यात्रेत परंपरेनुसार तिसाई भक्त मोठ्या श्रध्देने आणि आस्तेने सहभागी होत आहेत .


उद्या सकाळी देवीच्या पुजे नंतर दुपारी  देवीची पुष्प सजावट व साज श्रृंगार झाल्यावर देवीला मान सन्मान व नैवैद्य देण्यात येणार आहे . देवीच्या यात्रेनिमित्त गांवदेवी मंदीराच्या प्रांगणात रविवारी दुपारी ३ वाजेपासुन भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्त्यांच्या दंगलीत मागील प्रथे प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकीत पैलवान सहभागी होणार आहेत . यात्रे निमित्त संपुर्ण तिसगांव परिसरात आकाश पाळणे, मौत का कुआ, लहान मुलांच्या हौस मौजेचे विविध प्रकारची साधने स्थानापन्न झाली असुन संपूर्ण तिसगांव परिसर लहान मोठ्या व्यापार्‍यांनी व्यापून टाकला आहे .


देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांसह कुस्तांच्या दंगलीचाही लाभ घेण्याचे आवाहन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड, जरीमरी सेवा मंडळाचे संचालक भगवान भोईर, अध्यक्ष दत्ता गायकवाड, सचिव नरेंद्र सुर्यवंशी तसेच खजिनदार पंडीत आत्माराम भोईर यांनी    केले आहे. 

Post a Comment

0 Comments