जे.के. पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड जुनिअर कॉलेजचे चीफ ट्रस्टी गजानन पाटील यांना उत्कृष्ट संस्था चालक राज्यस्तरीय पुरस्कार

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना महामारीत सामान्य नागरिकांसह भले-भले उद्योजक मेटाकुटीला आल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली. ही परिस्थिती सर्वच क्षेत्रात दिसून आली. ज्याप्रमाणे कोरोना योद्धानी सामाजिक बांधिलकी जपत उत्तम कार्य केले तसेच शिक्षण क्षेत्रातील उद्योजकांनीही भरीव कार्य केले. 


यासाठी महाराष्ट्र इंग्लिश मिडीयम स्कूल ट्रस्ट असोसिएशन (मेस्टा) तर्फे कोरोना काळात उत्कृष्ट शालेय कार्य विषयावर राज्यतून सर्वेक्षण केले. यामध्ये भोपरगाव डोंबिवली पूर्व येथील जे के पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड जुनिअर कॉलेजचे चीफ ट्रस्टी गजानन काशिनाथ पाटील यांना उत्कृष्ट संस्था चालक हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याने शहरात त्यांचा गौरव होत आहे.


सदर पुरस्कार सोहळा मेस्टाचे वार्षिक अधिवेशन मुंबई मंत्रालय येथे नुकतेच पार पडले. यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण विभागाचे कार्यकारी संचालक अॅलन ब्लेगिच, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे यांच्या हस्ते गजानन काशिनाथ पाटील यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.


या पुरस्काराबाबत पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून केलेल्या कामाचे चीज झाले असे गौरवउदगार काढले. कोरोना काळात अनेक संकटांना जसे सर्वांना सामोरे जावे लागले तसाच अनुभव मलाही आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मुलांचे त्याचबरोबर शिक्षकांचे मनोबल राखण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना फीसाठी कोरोना काळात विचारणा केली नाही त्याचप्रमाणे शिक्षकांना पगार दिलाच पाहिजे त्यासाठी स्वतःच्या मालमत्तेची पर्वा केली नाही. 


शिक्षक व विद्यार्थी हे माझे कुटुंब आहे आणि मी कुटुंबप्रमुख आहे या तत्वाने कोरोना काळावर मात केली. कोरोना पूर्वी माझे स्वतःचे आरोग्य ठीक नव्हते त्यात माझा पुनर्जन्मच झाल्याची परिस्थिती असल्याने कर्तव्य बजावून कार्य करायचे ही शिकवण अंगी असल्याने यात मला प्रभूची साथ मिळाली. या सर्व कार्याबद्दल हा पुरस्कार मिळत आहे त्यात मी आनंदी व सुखी आहे असे भावनात्मक वक्तव्य पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments