विजेच्या भारनियमना मुळे मलंगगड परिसरातील नागरिक त्रस्त भारनियमन रद्द करण्याची शिवसेनेची मागणी


कल्याण : सध्या वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त असतानाच मलंगगड परिसरात विजेच्या भारनियमनामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. दिवसभर उन्हाच्या काहिलीत नागरिक होरपळून निघत असतानाच दिवसा आणि रात्रीही वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार होऊ लागल्याने मलंगगड परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. याबबत शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले आहे. तसेच तातडीने भारनियमन रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महेश गायकवाड यांच्यासह नेवाळीचे माजी सरपंच तथा विभागप्रमुख चैनु जाधव, समाजसेवक विलास पाटील आदीजण उपस्थित होते.


           कल्याण पूर्वेतील मलंगगड भागात दोन ते तीन दिवसांपासून रात्रीच्या १० वाजल्यापासून १ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. रात्रीच्यावेळी होणाऱ्या लोडशेडिंग मुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी अभ्यास करत असतात. मात्र मध्येच महावितरणकडून रात्रीच्या वेळी लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिक त्रासले आहेत. ग्रामीण भागात लग्न सराईतर कुठे हरिनाम सप्ताह सुरू आहेत.


    महावीतरणच्या रात्रीच्या लोडशेडिंगचा फटका हा सर्व नागरिकांना बसताना दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कल्याण येथील तेजश्री या मुख्य कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोर  नागरिकांची समस्या मांडली आहे. होणारे लोडशेडिंग त्वरित रद्द न केल्यास त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकाकडून होणाऱ्या जन आंदोलन तसेच आपल्या विद्युत वितरण कंपनीला होणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या कार्यवाहीस महावितरण स्वतः जबाबदार असेल असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments