भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील कु.भाग्यश्री विजय गायकवाड हिने जयंती निमित्ताने लिहला बाबासाहेबावर छान लेख


प्रज्ञा, शील, करुणा ह्या त्रिरत्नांवर आपल आयुष्य उभं करणाऱ्या आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ह्या संकल्पनांद्वारे आपल्या जनमानसांच जीवन बदलून टाकणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन !!


आज मी लिहतेय एका अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल ज्यांची ओळख एक सामान्य मनुष्य म्हणून नाही तर आक्रमकतेने जळणारी मशाल म्हणून  आहे. एक अशी मशाल जी वर्षानुवर्ष चालत आलेल्या अस्पृश्यतेवर भडकली आणि मुळासकट तिला जाळून टाकली कर्माद्वारे,कागदाद्वारे आणि कायद्याद्वारे. हे व्यक्तिमत्त्व आहे दुसरं तिसरं कुणाचं नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच.


ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेली गुलामगिरी तर सर्वांनाच दिसली आणि समजली ही पण आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांवर 'अस्पृश्यते' च्या नावाखाली केलेली छळनुकीची कहाणी फक्त एकाच काळजाला जाऊन भिडली. असमानते पासून समानतेच्या प्रवासापर्यंत, शिक्षण ही घेऊ न शकणाऱ्या परिस्थिती पासून ते 'भारताचे पहिले बॅरिस्टर' ही पदवी मिळवण्यापर्यंत, गुलामगिरीतला देश ते देशाला खऱ्या अर्थाने लोकतंत्र बनवण्यासाठी त्याला प्रधान केलेल्या संविधानापर्यंत, कायदेव्यवस्थेपासून ते "the problem of rupee" च्या स्वरूपात अर्थव्यवस्थेपर्यंत, अशा अनेक गोष्टींपासून अनंत गोष्टींपर्यंत बाबासाहेबांच्या योगदानाला नाही तोड आहे नाही जोड.आजच्या 21व्या शतकातल्या Rightest/Leftist ह्या संकल्पनेत गुरफटून जाणाऱ्या युवाला हवा आंबेडकरांसारखा दिवा ज्यांनी स्वतःच उद्देश भलेही मेणबत्तीच्या अल्प प्रकाशात शोधलं परंतु ते सापडल्यावर संपूर्ण देशाचं मार्ग आणि येणाऱ्या पिढ्यांच भविष्य प्रकाशमय बनवून सोडलं.
आज मला बाबासाहेबांबद्दल लिहावस वाटतं कारण माझ्यासारख्या युवाला त्यांची उणीव जाणवते -
जेव्हा देशाच्या जनतेची भूक मिटवणारा माझा शेतकरी कर्जाच्या डोंगराखाली दबून शेवटचा श्वास घेतो तेव्हा आठवण होते मला शेतकरी स्नेही डॉ.आंबेडकरांची.


जेव्हा आजचे राजनेते communalism च्या छपराखाली राहून राजकारण करू पाहतात तेव्हा आठवण होते जातीनिर्मुलन करणाऱ्या सत्यग्रही डॉ.आंबेडकरांची.
जेव्हा आजच्या 21व्या शतकातही माणसापासून माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावला जातो तेव्हा आठवण होते माणसाला माणसाचं हक्क मिळवून देणाऱ्या युक्तिवादी डॉ. आंबेडकरांची.


जेव्हा स्त्रीवर होणाऱ्या अन्यायांवर कागद तर रंगवली जातात परंतु कायदा मागे पडू लागतो तेव्हा आठवण होते स्त्रीशक्ती आणि स्त्रीमुक्तीसाठी लढा देणाऱ्या डॉ. आंबेडकरांची.
अशा असंख्य गोष्टी आजही उणीव आणि जाणीव करून देतात अष्टपैलू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची.
'आंबेडकर' हे व्यक्तिमत्त्व फक्त एक  माणूस नाही, तर तो सदैव जिवंत राहणारा एक विचार आहे, लाखो दलित- पीडितांची मशाल आहे, शिक्षणाच्या शेत्रात विद्यार्थी मित्रांसाठी ठरलेली प्रेरणा आहे, अन्यायाविरुद्ध जाऊन न्याय मिळवून देणारा एक प्रवाह आहे, कल्पनेपलिकडील एक कल्पना आहे आणि अखंड स्मरणात राहणारी एक चिरंजीव आठवण आहे.

Post a Comment

0 Comments