संविधानिक मार्ग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक प्रणालीवरच चालणार मुंब्रा येथील सर्व मौलवींनी केले शांततेचे आवाहन


ठाणे (प्रतिनिधी)  -    इस्लाम हा शांततेचा संदेश देणारा धर्म आहे. त्यामुळे एखादा मुस्लीम तरुण जर बोलत असेल तर तो सर्व समाजाचे प्रतिनिधीत्व करीत नाही. तत्कालीक प्रसिद्धीसाठी तो अशी विधाने करीत आहे. त्याचे हे वाक्य समस्त मुस्लीम धर्मियांसाठी लागू होत नाही. त्यामुळे त्याची आम्ही सर्वांनी निंदा केलेलीच आहे. आमचा धर्म शांतता शिकवत असल्याने संविधानिक मार्ग, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक प्रणाली आणि शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या पलिकडे आम्ही जाणार नाही, अशी भूमिका मुंब्रा येथील सर्व मौलवींनी मांडली.  


मुंब्रा येथील मुस्लीम समुदायाने अत्यंत सामोपचाराची भूमिका घेत तणाव निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने मौलाना अब सलाम, मुफ्ती अश्रफ, मौलाना रफिक अजमल, मौलाना अजहर, मौलाना वहाब कासीम, मौलाना सफिक अजमल, मौलाना अजहर, मोलाना फैसल, हाफिज अयुब, मौलाना  सियाफुल, मुफ्ती अब बसीत, मौलाना रिझवी, हाफिज शाकिर कादरी, मौलाना शफिक नादवी, डॉ. राऊत, डॉ. काझीशाहब, मौलाना मदनी यांच्या पुढाकाराने मुंब्रा येथील सुमारे 60 ते 70 मौलवींनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत मुस्लीम समुदायासह सर्वांनाच  शांततेचे आवाहन केले आहे. 


यावेळी मौलांनींनी सांगितले की, मुंब्रा हे सामाजिक एकतेचे प्रतिक असलेले शहर आहे. मुंब्य्रात प्रवेश केल्यानंतर मंदिर आणि मशिद आजूबाजूला असल्याचे चित्र दिसून येते.  येथील हिंदू-मुस्लीम हा भावा-भावाप्रमाणे रहात आहे. आमच्या दृष्टीने धर्माच्या पातळीवर कुराण-ए शरीफ महत्वाचे असले तरी देशाच्या दृष्टीने आम्हीदेखील राष्ट्र म्हणून केवळ संविधानालाच सर्वश्रेष्ठ मानत आहोत.


आमचा धर्म हा शांतता आणि कायद्याचे पालन करण्याची शिकवण देत आहे. त्यामुळे कोणी काय बोलतो; किंवा कोणी काय विधाने करतो, याच्याशी सामान्य मुस्लीम समाजाला काहीही देणेघेणे नाही. अशा माथेफिरुंच्या विधानाला आम्ही गांभीर्याने घेत नाही.  संविधानिक मार्ग आहे; त्या संविधानाच्या मार्गावरच आम्ही चालणार आहोत. ज्या कोणी तरुणाने माथी भडकवणारी विधाने केली आहेत; तो तरुण काही सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठीत नाही; त्यामुळे तत्कालीक प्रसिद्धीसाठी माथेफिरु लोक काहीही करीत असतात. 


अशा लोकांची निंदा करायलाच हवी. अल्लाहू-अकबर ही घोषणाच मूळात देव हा सर्व शक्तीमान, सर्वश्रेष्ठ आहे, मग, देव हा कोणत्याही धर्माचा असू दे; तोच सर्वशक्तीमान आहे.  हेच सांगणारी आहे. असेही यावेळी या सर्व मौलवींनी सांगितले.

Post a Comment

0 Comments